आरोसमध्ये बिबट्याने 13 बोकडे पळविली
सुमारे 75 हजारांचे नुकसान ;बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे परिसरात भीती
वनविभागाने तत्काळ उपायोजना करण्याची मागणी
न्हावेली / वार्ताहर
आरोस-दांडेली धनगरवाडी येथे महिनाभरात एक दिवस आड करून तब्बल 13 बोकडे बिबट्याने पळवल्याची घटना समोर आली आहे. रविवारी तर ग्रामस्थांनी बिबट्याचा पाठलाग केला परंतु जबड्यात पकडलेला बोकड बिबट्याने न सोडता जंगलात धूम ठोकली. बंदिस्त गोठ्यात बांधलेल्या बोकडांवर वारंवार बिबट्याकडून हल्ला होत असल्यामुळे पशुपालक बबन केदु शेळके यांचे सुमारे 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.सावंतवाडी तालुक्यातील आरोस दांडेली धनगरवाडी येथील बबन केदु शेळके यांचा बोकडांचा बंदिस्त गोठा आहे. अनेक वेळा बोकडे जंगल परिसरात चरायला घेऊन जावी लागतात. शेळके म्हणाले की, महिनाभरात एक दिवस आड करून रात्रीच्यावेळी बिबट्या बोकडांवर हल्ला करतो. अनेक वेळा त्याला उसकावून लावण्याचा प्रयत्नही केला. परंतु रक्ताला आसुसलेल्या बिबट्याने एक एक करून बोकडांच्या 13 नगांवर हल्ला केला व जंगलात घेऊन गेला.
दोन दिवसांपूर्वी आम्ही बोकडे चरण्यासाठी घेवून गेलो होतो. त्यावेळी रात्री घराच्या व्हरांड्यातून कुत्र्याला पळविले. सदर बिबट्या मोठा असून प्रत्यक्षात पाहिल्यावर भीती निर्माण होते. बंदिस्त गोठ्यात बिबट्या प्रवेश करत असल्यामुळे आमच्याही जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वन विभागाने यावर तत्काळ उपाय काढावा अशी मागणी बबन केदु शेळके यांनी केली आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी 12 वाजेर्यंत वनविभाग अधिकारी आले नव्हते. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.
बिबट्याला जेरबंद करा : शंकर नाईक
बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने त्वरित पिंजरा किंवा अन्य उपाययोजना करून सदर बिबट्याला जेरबंद करावे. तसेच पशुपालकांची झालेली नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी आरोस सरपंच शंकर नाईक यांनी केली आहे.