महिलांनी जाळली कुत्र्यांची पिले
वृत्तसंस्था / मेरठ
भुंकण्याचा त्रास होतो म्हणून दोन महिलांनी भटक्या कुत्रीची पाच पिले जिवंत जाळून मारल्याची घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील कांकेरखेडा येथे घडली आहे. शोभा आणि आरती अशी या महिलांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या महिलांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून तक्रार प्राणीदया संघटनेच्या अधिकारी अंशुमाली वसिष्ठ यांनी सादर केली आहे.
5 नोव्हेंबरला ही घटना घडली. या महिलांच्या घराबाहेर एका भटक्या कुत्रीने पिलाना जन्म दिला होता. ही पाच पिले सातत्याने भुंकत असल्याने या महिलांना त्रास होत होता. या त्रासाला कंटाळून त्यांनी या पिलांवर रॉकेल टाकून त्यांना जिवंतपणीच पेटविले, असा आरोप आहे. त्यांना असे करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न त्यांच्या शेजाऱ्यांनी केला. तथापि, या महिलांनी शेजाऱ्यांना दाद दिली नाही. या महिलांवर प्राणी क्रूरता विरोधी कायद्यातील अनुच्छेद 325 अनुसार अभियोग सादर करण्यात आला असून पोलिस तपास करीत आहेत.
संतापाची भावना
कुत्र्याच्या पिलाना जिंवत जाळण्याच्या या प्रकारामुळे या खेड्यात संतापाची भावना व्यक्त होत आहे. हे कृत्य निर्दयपणाचे असून या महिलांना कठोर शिक्षा करावयास हवी, असे मत व्यक्त केले जात आहे. प्राणी दया संघटनांनी या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्वरित कारवाईची मागणी केली.