अवयवदानात महिला आघाडीवर
7 वर्षांमध्ये अवयवदानात 50 टक्क्यांची वृद्धी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात मागील 7 वर्षांमध्ये अवयवदानाच्या प्रमाणात सुमारे 50 टक्क्यांची वृद्धी झाली आहे, परंतु आकडेवारीनुसार प्रत्यारोपण करण्याची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने हे प्रमाण अद्याप फारच कमी ठरले आहे. अवयवदान करण्याचा प्रकार भारतात वाढत असला तरीही अवयव प्रत्यारोपणदेखील अववयदानाच्या तुलनेत अत्यंत वेगाने वाडत आहे. भारतात 2016 मध्ये 6,916 अवयव प्रत्यारोपित झाले होते. 2021 मध्ये हा आकडा वाढून 12,259 वर पोहोचला आणि यात सुमारे 77 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. यात मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुस, स्वादूपिंड प्रत्यारोपणाचा समावेश आहे.
2014 मध्ये मृत दात्यांकडून दान करण्यात आलेल्या अवयवांची संख्या 1,030 होती. तर मागील वर्षी हा आकडा 1,619 वर पोहोचला आहे. यात सुमारे 57 टक्क्यांची वृद्धी नोंद झाली आहे. जिवंत व्यक्तींकडून मूत्रपिंड किंवा यकृत प्रत्यारोपण करण्याची संख्या यात सामील आहे. अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची संख्या आणि अवयवय दानातील प्रमाणात मोठे अंतर आहे. भारतात आजही अवयवदानावरून अज्ञान, अंधश्रद्धेची स्थिती असल्याने मोठी जागरुकता निर्माण झालेली नाही.
आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी
आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर नोंद आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे 1.8 लाख लोकांना मूत्रपिंड निकामी होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. तरीही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची संख्या 6 हजाराच्या आसपास आहे. भारतात दरवर्षी सुमारे 2 लाख रुग्णांचा मृत्यू यकृत निकामी झाल्याने किंवा यकृताच्या कर्करोगामुळे होतो. दरवर्षी सुमारे 25 ते 30 हजार जणांवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याची गरज असते, परंतु प्रत्यक्षात केवळ 1500 यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत आहेत. अशाच प्रकारे सुमारे 50 हजोर लोक हार्ट फेल्युयरला बळी पडत असतात. परंतु दरवर्षी केवळ 10-15 च हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत आहेत.
महिलांकडून अवयवदान अधिक
भारतात 12,625 प्रत्यारोपणांपैकी 72.5 टक्के अवयव प्राप्त करणारे पुरुष होते. मागील 20 वर्षांमध्ये जिवंत अवयवदात्यांमध्ये 75-80 टक्के महिला होत्या. आणि प्राप्तकर्त्यांमध्ये समान हिस्सा पुरुषांचा होता.