महिला-बालकल्याण खाते संपूर्ण देशासाठी आदर्श
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन : मुलांसाठी अनेक योजना राबविण्याचे श्रेय काँग्रेस पक्षाला
बेंगळूर : राज्यातील महिला आणि बालकल्याण खाते हे संपूर्ण देशासाठी आदर्श आहे. आमचे राज्य समग्र बालविकास योजना (आयसीडीएस) समर्पक पद्धतीने राबवत आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेंगळूरमध्ये 28 नोव्हेंबर रोजी अंगणवाडी स्थापनेचा सुवर्ण महोत्सव, अक्का पथक, गृहलक्ष्मी बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या उद्घाटन समारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी कोलार जिल्हा प्रशासन भवनात आयोजित पूर्वतयारी बैठकीत बोलताना त्या म्हणाल्या, आमचे महिला-बालकल्याण खाते संपूर्ण देशासाठी एक आदर्श म्हणून काम करत आहे.
महिला आणि मुलांसाठी अनेक कार्यक्रम राबविण्याचे श्रेय काँग्रेस पक्षाला जाते. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने हैराण झालेल्या सामान्य माणसाला सुविधा देण्यासाठी गॅरंटी योजना राबविण्यात आल्या आहेत. 2023 च्या निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आम्ही पाच गॅरंटी योजना राबविल्या आहेत. आमचा पक्ष महिला सक्षमीकरणाचे काम करत आहे. जेव्हा संपूर्ण देश गरिबीने ग्रासला होता, तेव्हा गरीब मुलांनाही पौष्टिक अन्न आणि दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे या उद्देशाने म्हैसूर जिल्ह्यातील टी. नरसीपूर येथे इंदिरा गांधी यांनी अंगणवाडी केंद्रे सुरू केली. त्यानंतर आमच्या पक्षाने सामान्य लोकांना लाभ व्हावा यासाठी आरटीई, आरटीआय, अन्न सुरक्षा कायदा, महिलांसाठी आरक्षण आणि स्थानिक प्रशासनात 50 टक्के आरक्षण लागू केले, असे त्या म्हणाल्या.
गृहलक्ष्मी सहकारी संस्थेच्या यशासाठी हातभार लावा
28 नोव्हेंबर रोजीचा कार्यक्रम हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा उद्देश पुढील 50 वर्षांसाठी एक मजबूत पाया रचणे आहे. महिला सक्षमीकरणासाठी गृहलक्ष्मी योजना राबविण्यात आली आहे. या योजनेच्या यशाचे श्रेय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना जाते. त्याचप्रमाणे गृहलक्ष्मी बहुउद्देशीय सहकारी संस्था यशस्वी झाली पाहिजे. ही माझा स्वप्नातील योजना आहे. त्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
महिला सक्षमीकरण आणि संरक्षण पुरविण्यासाठी अक्का पथका सुरुवात केली जात आहे. अक्का पथक दाट लोकवस्तीच्या भागात गस्त घालेल. जर मुलींना घराच्या आत किंवा बाहेर कोणत्याही प्रकारची असुरक्षितता जाणवत असेल तर त्यांनी हेल्पलाईनद्वारे अक्का पथकाला माहिती द्यावी, असेही त्या म्हणाल्या. शिवाय, तळागाळातील गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने अंगणवाडी केंद्रांमध्ये एलकेजी आणि यूकेजी वर्ग सुरू केले जात आहेत. गरीब मुलांना पौष्टिक आहाराबरोबरच उत्तम शिक्षण देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.