ओसरगाव येथे महिलेचा जळालेल्या स्थितीत आढळला मृतदेह
कणकवली / प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे एका महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. सोमवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. दरम्यान हा घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच मृतदेह बाहेरून आणून येथे जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ओसरगाव येथे एमवीडी कॉलेज पासून काही अंतरावर महामार्गापासून सुमारे 100 मीटरवर एकाच ठिकाणी आग दिसून आली. सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता बहुतांशी मृतदेह जळालेला होता. उपलब्ध माहितीनुसार फक्त पाय शिल्लक असल्याचे समजते. घटनेबाबत माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे श्री. पाटील यांच्यासहित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गापासून सुमारे 100 मीटर अंतरावर मृतदेह पेट्रोल वा डिझेल ओतून जाळण्यात आला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून सदरची टीम कोल्हापूरहून येण्यास निघाली असल्याचे सांगण्यात आले.