धक्कादायक : साताऱ्यात महिलेने तोंडावर स्प्रे मारून महिलेला लुटले
साताऱ्यात अज्ञात महिलेकडून सोन्याची लूट
सातारा : जेवण मागण्याच्या बहाण्याने एकाअज्ञात महिलेने वृद्धेला तोंडावर स्प्रे मारुन बेशुद्ध करत तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना मोहन जाधव (वय ५५, रा. जिजाऊ हाउसिंग सोसायटी, हिंदवी शाळेजवळ), या घराबाहेर पोर्च स्वच्छ करीत होत्या. त्याचवेळी सुमारे ४५ वर्षांची अनोळखी महिला त्यांच्या घराबाहेर आली. भूक लागल्याचे सांगत तिने जेवणाची मागणी केली.
जाधव या जेवण आणण्यासाठी घरात गेल्या असता ती महिला त्यांच्या पाठोपाठ घरात शिरली. त्यानंतर तिने तहान लागल्याचे सांगत पाण्याची मागणी केली.
पाणी देत असताना त्या अज्ञात महिलेने जाधव यांच्या तोंडावर स्प्रे मारून त्यांना बेशुद्ध केले. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तिने जाधव यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र, मणी, तसेच कानातील सोन्याचे टॉप्स असा एकूण ५० हजार रुपये किमतीचा ऐवज काढून घेत पलायन केले.
काही वेळानंतर जाधव यांना शुद्ध आल्यानंतर लुटीची घटना लक्षात आली. त्यांनी तत्काळ ही माहिती घरच्यांना दिली. त्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. महिलेचा शोध सुरू असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिर्के हे करत आहेत.