For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘वूमन इन ब्ल्यू’ला गरज सातत्याची !

06:28 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘वूमन इन ब्ल्यू’ला गरज सातत्याची
Advertisement

यंदा भारतीय पुरुष क्रिकेट संघानं बऱ्याच काळापासून खात्यात भेडसावणारी विश्वचषकाची उणीव दूर केली ती ‘टी-20’ स्पर्धेतूनच...त्याशिवाय काही दिवसांपूर्वी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आपण ‘गोल्डन डबल’ साधण्याचा पराक्रम केला तो पुरुषांबरोबर महिलांनाही किताब पटकावल्यानं...ही यशस्वी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रताप कालपासून सुरू झालेल्या ‘टी-20 विश्वचषका’त भारतीय महिला क्रिकेट संघ करू शकेल काय ?...या ‘वर्ल्ड कप’नं नेहमीच त्यांना हुलकावणी दिलेली असली, तरी यंदा हा इतिहास बदलण्याची ताकद ‘हरमनप्रीत अँड कंपनी’मध्ये निश्चित दडलीय...

Advertisement

काल 3 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिरातीत महिलांची ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धा सुरू झालीय आणि त्यात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यासह ‘अ’ गटात धावताना दिसेल तो हरमनप्रीत कौरच्या सारथ्याखालील भारतीय रथ...जर आम्ही विजेतेपद खेचण्यात यश मिळविलं, तर महिला क्रिकेटच्या इतिहासात भारताला प्रथमच तो मुकुट धारण करण्याचं भाग्य लाभेल...जेव्हा आपल्या 12 महिला खेळाडू मैदानावर पाऊल ठेवतील तेव्हा त्यांच्या खांद्यांवर असेल कोट्यावधी क्रिकेट रसिकांच्या वाढलेल्या अपेक्षांचा भार...आपल्या वरिष्ठ संघाला अजूनपर्यंत ही स्पर्धा जिंकणं शक्य झालेलं नाहीये. फक्त शेफाली वर्माच्या 19 वर्षांखालील संघानं 2023 साली ‘टी-20’ विश्वचषक जिंकला होता. त्यामुळं जगज्जेतेपदाची चव काय असते हे माहीत असलेली संघातील ती एकमेव खेळाडू...

Advertisement

महिलांच्या ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला होता तो 2009 साली आणि तेव्हापासून सातत्यानं सहभागी झालेली कर्णधार हरमनप्रीत कौर ही एकमेव भारतीय खेळाडू...तिला वाटतंय की, यंदाच्या स्पर्धेत उतरलेला संघ हा अजूनपर्यंतचा सर्वोत्तम. ‘या संघातील काही खेळाडूंना फार मोठा अनुभव असून प्रत्येकाला त्यांची भूमिका माहीत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत यापूर्वी इतका बलवान संघ कधी उतरलेला नाहीये’, उत्साहानं भरलेल्या हरमनप्रीतचे शब्द...विशेष म्हणजे संघातील 15 पैकी तब्बल 12 खेळाडूंना विश्वचषकाचा अनुभव असून फक्त श्रेयांका पाटील, आशा शोभना अन् एस. साजना यांनीच स्पर्धेचं दर्शन घेतलेलं नाही...

शिवाय काही खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्यांनी भरपूर धावांची नोंद केलीय. उदाहरणार्थ स्मृती मानधना. एकदिवसीय क्रिकेटमध्ये लागोपाठ दोन शतकं फटकावणारी ती पहिली भारतीय ठरलीय. 12 दिवसांच्या कालावधीत तिनं एका कसोटी खेळीसह नोंद केली ती तीन शतकांची...दीप्ती शर्मानं तर ‘टी-20’ फलंदाजीला एका वेगळ्याच उंचीवर नेलंय. कारकिर्दीच्या सुरुवातीला नेहमीच तिच्या धावा काढण्याच्या गतीसंबंधी प्रश्नचिन्ह उभं राहायचं. पण तो मुद्दा आता मागं पडलाय. महिलांच्या ‘प्रीमियर लीग’मध्ये तसंच यंदाच्या ‘हंड्रेड’ स्पर्धेत तिच्याकडून वेगवान डाव पाहायला मिळालेत...

‘हंड्रेड’मध्ये दीप्तीनं 126.75 च्या ‘स्ट्राईक रेट’नं 289 धावा फटकावल्या व ‘लंडन स्पिरीट’ला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. यंदाच्या ‘महिला प्रीमियर लीग’मध्ये सुद्धा दीप्ती शर्मानं नोंदविली ती 136.57 ची गती...‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेत भारतातर्फे सर्वांत जास्त बळी मिळविलेत ते पूनम यादवनं. तिला वाटतंय की, दीप्तीला आता वरच्या क्रमांकावर पाठविण्याची वेळ आलीय...भारतीय महिलांच्या संघाला काळजी करायला लावणारा प्रश्न म्हणजे त्यांना स्पर्धेच्या आधी मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय सामने खेळता आलेले नाहीत. त्यांना शेवटची संधी मिळाली होती ती दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ‘आशिया चषक’ स्पर्धेत. परंतु तेव्हाही अनपेक्षितरीत्या अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला...

मात्र भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना त्याची फारशी काळजी वाटत नाही. त्यांच्या मते, ‘महिला खेळाडूंनी भरपूर सराव केलाय अन् स्पर्धात्मक सामन्यांत भाग घेतलाय. योग्य सराव मिळावा म्हणून त्या लढतींसाठी आम्ही विविध प्रकारच्या प्रतिस्पर्ध्यांची निवड केली होती’...भारताच्या महिला संघाची कच्ची बाजू म्हणजे क्षेत्ररक्षण. त्यामुळं त्याच्यावर जास्तीत जास्त भर देण्यात आलाय. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महत्त्वाच्या वेळी सुटलेले दोन झेल भरपूर महागात पडून पराभवाला सामोरं जाण्याचा प्रसंग ओढवला होता हे संघ विसरलेला नसेल. विश्वचषकात मात्र ‘वूमन इन ब्ल्यू’ला या त्रुटी सुधाराव्या लागतील...

जागतिक क्रिकेट विश्लेषकांना वाटतंय की, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स अन् रिचा घोष यांच्या या संघाला विश्वचषक जिंकण्याची संधी निश्चितच आहे. या स्पर्धेत भारतातर्फे धावा नोंदविण्याच्या बाबतीत मिताली राजनंतर दुसरा क्रमांक मिळविलाय तो कर्णधार हरमनप्रीत कौरनं...भारताची गोलंदाजी सुद्धा पूजा वस्त्रकार, अरुंधती रे•ाr अन् रेणुका सिंग या वेगवान गोलंदाजांमुळं धारदार वाटतेय. राधा यादव, दीप्ती शर्मा, तंदुरुस्त श्रेयांका पाटील, आशा शोभना नि एस. साजना यांचा समावेश असलेला आपला फिरकी मारा देखील अनेकदा प्रतिस्पर्ध्यांच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात घातक ठरलाय. परंतु भारताला चषकाचा सर्वांत मजबूत दावेदार असं म्हणणं मात्र जड जाईल. कारण त्यांना सातत्य दाखविणं केव्हाही जमलेलं नाहीये...

डिसेंबर, 2023 नंतर आम्ही इंग्लंड, ऑस्ट्रेलिया नि दक्षिण आफ्रिका यांच्याबरोबर मायभूमीत सामने आयोजित केले अन् बांगलादेशचा दौराही केला. इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका 1-2 अशा गमवाव्या लागल्या, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सिरीज 1-1 अशी बरोबरीत सुटली. बांगलादेशला मात्र आम्ही 5-0 असं चिरडण्यात यश मिळविलं...भारतानं विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तब्बल पाच वेळा प्रवेश केलाय, पण प्रत्येक वेळी वाट्याला आला तो ‘हार्टब्रेक’च. पूनमला वाटतंय की, यावेळी भारतानं क्रीडा मानसोपचारतज्ञ मुग्धा बावरे यांचा घेतलेला आधार अनेक प्रश्न सोडविण्यास मदत करेल. ती म्हणते, ‘भारताच्या हातून कित्येकदा सामने निसटलेत. परंतु हरमनप्रीतचा हा संघ अनेक बाबतीत वरचढ ठरेल’...

भारताची फलंदाजी फिरतेय ती मानधना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा नि जेमिमा रॉड्रिग्स यांच्याभोवती. पण मधल्या फळीत रिचा घोषचा अपवाद सोडल्यास आक्रमक महिला खेळाडूचं दर्शन घडत नाही. भारतानं तिसऱ्या क्रमांकासाठी अनेक प्रयोग करून पाहिलेत. जेमिमा रॉड्रिग्सनं तिथं येऊन बऱ्यापैकी कामगिरी नोंदविली होती. परंतु सध्या ती पाचव्या क्रमांकावर खेळतेय. हरमनप्रीत, दयालन हेमलता, यास्तिका भाटिया नि उमा चेत्री अशा अनेकांना तिसऱ्या स्थानावर खेळवून पाहण्यात आलंय. मात्र अजूनपर्यंत ठोस उत्तर मिळालेलं नाही. प्रशिक्षक अमोल मुझुमदार म्हणतात, ‘आमच्या संघातील सहा महिला खेळाडू दर्जेदार असून प्रत्येकाची शैली ही वेगळी. तिसऱ्या क्रमांकासाठी मी खेळाडूला शोधून काढलंय. पण आताच नाव जाहीर करणं योग्य ठरणार नाहीये’...

भारताला जर बाजी मारायची असेल, तर अनेक वरिष्ठ खेळाडूंना जबाबदारी पेलावी लागेल. याबाबतीत साऱ्यांचं लक्ष केंद्रीत झालेलं असेल ते कर्णधार हरमनप्रीतवर. 2023 साली तिनं आपल्याला अंतिम सामन्याचं दर्शन जवळपास घडविलं होतं. पण त्यावेळी हातातोंडाशी येऊन निसटलेल्या संधीचं यंदा सोनं करावं लागेल. त्याशिवाय ‘टी-20’ क्रिकेटमध्ये 131 बळी घेणारी दीप्ती शर्मा आहेच. तिनं आता फलंदाजीही  सुधारल्यानं संघाला मधल्या फळीत फार मोठा आधार मिळेल. मात्र गरज आहे ती पुन्हा तीच, सातत्य दाखविण्याची...श्रेयांका पाटीलनं सुद्धा महिलांच्या प्रीमियर लीगमध्ये 15 सामन्यांत 19 बळी खिशात घालून चुणूक दाखविलीय...

तथापि, भारताची फार मोठी भिस्त असेल ती सातत्यानं अर्धशतकाची वा शतकाची नोंद करत आलेल्या स्मृती मानधनावर. पूनमच्या मते, भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड नि दक्षिण आफ्रिका यांच्यात उपांत्य फेरीचे सामने रंगतील...आता सर्वांना वेध लागलेत ते भारतीय महिला संघ कशा पद्धतीनं कामगिरी करणार याचेच !

या तारकांवर राहील नजर...

? अॅमेलिया केर : न्यूझीलंडमध्ये वयाच्या 14 व्या वर्षापासून मैदानातील प्रतापामुळं प्रसिद्ध झालेल्या या खेळाडूनं ‘वर्ल्ड कप’मध्ये पाऊल ठेवलंय ते चांगल्या फॉर्मसह...‘टी-20’तील महिला अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या केरनं तिच्या मागील 5 ‘टी-20’ सामन्यांमध्ये टिपलेत 8 बळी आणि केल्याहेत 143 धावा...

? बेथ मुनी : 2020 मधील ‘टी-20 विश्वचषक’ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील ऑस्ट्रेलियन नायिकांपैकी एक. बेथ यावेळीही जेतेपद इतर कोणाकडे जाऊ देण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. ऑस्ट्रेलियाची ही सलामीची फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि ती संघासाठी किताब कायम राखण्याच्या दृष्टीनं हुकमाचा एक्का ठरेल...

? चमारी अटापट्टू : कर्णधार अटापट्टूच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या महिला संघानं अनेक शिखरं प्रथमच सर करून दाखविलीय. हा सर्व अनुभव आणि तिची अष्टपैलू क्षमता संघाला पहिल्या विजेतेपदाच्या जवळ पोहोचवू शकेल का हे पाहावं लागेल...

? फातिमा साना : पाकिस्तानी महिला संघाच्या या नवीन कर्णधारानं आपण खेळातील महत्त्वपूर्ण क्षणांच्या वेळी योगदान देण्याची ताकद कशी बाळगते ते दाखवून दिलंय. पण तिचं रुपांतर एका बड्या ‘गेम लीडर’मध्ये होऊ शकेल का या प्रश्नाचं उत्तर या स्पर्धेतून मिळेल...

? हेली मॅथ्यूज : 2016 च्या ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अजिंक्य वाटणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाचा पराभव करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या चमूचा एक मोलाचा भाग राहिलेली खेळाडू. तिनं 45 चेंडूंत फटकावलेल्या 66 धावांमुळं विंडीजला 149 धावांचं आव्हान सहज पेलता येऊन त्यांचं पहिलं विश्वविजेतेपद पटकावता आलं होतं...जागतिक क्रमवारीतील अव्वल अष्टपैलू खेळाडू असलेली हेली आता संघाची कर्णधार असल्यानं ती देशाला दुसऱ्या किताबापर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे...

? कॅथरिन ब्राईस : तिनं स्कॉटलंडतर्फे ‘टी-20’मध्ये पदार्पण केलं ते 2018 मध्ये. असं असूनही कॅथरीननं बजावलेल्या कामगिरीमुळं 2011 ते 20 या दशकातील ‘आयसीसी’च्या सहयोगी देशांमधील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून निवडण्यात आलं ते तिलाच. या ‘टी-20’ स्पर्धेत ती संघाचं अधिपत्य करतेय आणि अलीकडे नेत्रदीपक फॉर्ममध्ये राहिलीय. त्याच्या जोरावर ती अशक्यप्राय कामगिरी करून दाखवू शकेल का आणि स्कॉटलंडला पहिल्या विजेतेपदाच्या जवळ पोहोचवू शकेल का याकडे स्कॉटिश रसिकांच्या नजरा लागून राहिल्याहेत...

? लॉरा वोल्वार्ड : दक्षिण आफ्रिकेची ही दिग्गज खेळाडू व कर्णधार या स्पर्धेमध्ये उतरलीय ती चांगल्या फॉर्मसह. या वर्षाच्या सुऊवातीला द. आफ्रिकेच्या पुऊष संघानं ‘टी-20’ विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. शिवाय खुद्द महिला संघानं मागील स्पर्धेत भरारी घेतली होती ती तशीच. आता त्याच्या पलीकडे झेप घेण्याचं लक्ष्य ती बाळगून असेल...

? नाहिदा अख्तर : बांगलादेशची ही गोलंदाज टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केवळ 16 च्या सरासरीनं 100 बळी खात्यात जमा करण्यापासून केवळ एका बळीनं दूर आहे. ही डावखुरी फिरकी गोलंदाज केवळ 24 वर्षांची असून ती 87 लढती खेळलीय आणि तिची सर्वोत्तम गोलंदाजी आहे ती 8 धावांत 5 बळी अशी जबरदस्त...

? सोफी एक्लेस्टोन : ‘आयसीसी’ टी-20 आणि एकदिवसीय सामने या दोन्ही क्रमवारीत सर्वोच्च स्थानी असलेली ही इंग्लंडची डावखुरी फिरकी गोलंदाज. सध्या ती जरी सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसली, तरी या स्पर्धेत तिला सूर गवसण्याची आशा संघ बाळगून आहे. तसं झाल्यास इंग्लंड हा पराभूत करण्यास खूप कठीण असा संघ बनेल...

आजवरचे विजेते...

? 2009 : इंग्लंड

? 2010 : ऑस्ट्रेलिया

? 2012 : ऑस्ट्रेलिया

? 2014 : ऑस्ट्रेलिया

? 2016 : वेस्ट इंडिज

? 2018 : ऑस्ट्रेलिया

? 2020 : ऑस्ट्रेलिया

? 2022 : ऑस्ट्रेलिया

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.