मुंबईतील महिला डॉक्टरची महामार्गावर आत्महत्या
इस्लामपूर :
मुलुंड येथील डॉ.शुभांगी समीर वानखडे (44) या महिलेने महामार्गावर विठ्ठलवाडीजवळ हाताच्या व गळ्याच्या नसा कापून घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री घडली. ताण-तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
वानखडे या ईएसआयएस हॉस्पिटल एलबीएस मार्ग मुलुंड पश्चिम ग्रेटर मुंबई येथे राहत होत्या. त्यांचे पतीही डॉक्टर आहेत. हॉस्पिटलच्याच बिल्डींग नं 1 मधील कॉटर टाईप 4 मध्ये त्यांचे वास्तव्य होते. त्या मंगळवारी रात्री पुण्याच्या दिशेने जात होत्या. महामार्गावर विठ्ठलवाडी (ता.वाळवा) येथील पांढरावडाजवळ रस्त्याकडेला चारचाकी (एमएच 03 एआर 1896) थांबवून हाताच्या व गळयाच्या नसा कापून घेतल्या. त्या गाडीच्या पाठीमागे बेशुध्द अवस्थेत पडल्या होत्या.
काही लोकांनी ही घटना पाहिल्यानंतर इस्लामपूर पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. डॉ.राऊत यांनी त्या मृत असल्याचे घोषित केले. हातावरील व गळयावरील जखमांतून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीतील अहवालातून स्पष्ट झाले. याप्रकरणी सहायक फौजदार संदेश यादव यांनी वर्दी दिली. सकाळी शुभांगी वानखडे यांच्या नातेवाईकांनी येवून मृतदेह ताब्यात घेतला.