Solapur News: मुंबई पाठोपाठ सोलापूरची विमानसेवाही विस्कळीत
सोलापूर ते गोवाही विमानसेवा रद्द
सोलापूर: मुंबईत प्रवासी विमानसेवेत व्यत्यय आल्याने प्रवाशांतून एकीकडे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. अशातच आता सोलापूरची विमानसेवाही विस्कळीत झाली आहे. रविवारी गोव्यातून सोलापूरला येणाऱ्या विमानाचे टेकऑफ तांत्रिक कारणामुळे झाले नाही. त्यामुळे गोवा-सोलापूर विमानसेवा रद्द झालीच, शिवाय सोलापूर ते गोवाही विमानसेवा रद्द झाली.
दरम्यान अचानक गोव्याला जाणारे विमान रद्द झाल्याने सोलापूर विमानतळावर आलेल्या प्रवाशांना घरी परतावे लागले. होटगी रोडवरील विमानतळावरून मुंबई, गोवा, बेंगळूर याठिकाणी प्रवासी विमान सेवा सुरू झाल्याने सोलापूर विमानतळावर इंटरनॅशनल विमानतळाचा अनुभव सोलापूरच्या प्रवाशांना येत आहे. मात्र, आता विमानसेवेत काही अडचणी येत असल्याने प्रवाशांचा हिरमोड होत आहे.
खासगी बस, एसटी सेवेचा आधार रविवारी गोव्यावरून टेकऑफ होणारे विमान रनवेवर आल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून ही सेवा रद्द केली गेली. त्यामुळे गोव्याहून सोलापूरला निघालेल्या प्रवाशांना मार्ग बदलावा लागला. काही प्रवासी उद्याच्या विमानाने येण्याची शक्यता आहे. तर काहींनी खासगी बस, एसटी सेवेचा आधार घेतला.