टिप्पर-स्कूटी अपघातात महिला जागीच ठार
कारवार : टिप्पर आणि स्कूटी दरम्यान झालेल्या अपघातात महिला जागीच ठार तर स्कूटीवरील अन्य एक महिला व दोन बालके गंभीररित्या जखमी झाल्याची घटना हल्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलवडीजवळ घडली. अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव सुवर्णा अंत्रोळकर (वय 30 रा. मलवडी) असे आहे. अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव शोभा मारुती काशीलकर (वय 38) आणि जखमी बालकांची नावे अरूस (वय 5) आणि गोकुळ (वय 3) अशी आहेत. जखमींना उपचारासाठी हुबळी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, सुवर्णा अंत्रोळकर ही महिला अन्य एक महिला व दोन बालकांसह मलवडीकडे स्कूटीवरून निघाली होती. त्यावेळी नवग्राम दांडेली येथील नागराज शाबण्णा कांबळे हा चालक टिप्परमधून राखेची वाहतूक करीत होता. चालक कांबळे हा टिप्पर वेगाने आणि बेजबाबदारपणे चालवित असल्याने टिप्परची स्कुटीला जोराची धडक बसली. स्कुटीचालक महिला सुवर्णा अंत्रोळकर यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्या जागीच ठार झाल्या. या अपघातात शोभा काशीलकर आणि अरूष व गोकुळ नावाची अल्पवयीन मुले जखमी झाली आहेत. हल्याळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.