For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विहिरीत पडून महिलेचा मृत्यू सुदैवाने मुलगी बचावली

10:24 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
विहिरीत पडून महिलेचा मृत्यू सुदैवाने मुलगी बचावली
Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

उचगाव येथील चव्हाट गल्लीतील एक विवाहित महिला आणि तेरा वर्षांची मुलगी शेतवडीतील रस्त्याने जाताना पाय घसरून एकमेकीला वाचविताना दोघीही विहिरीत पडल्यामुळे महिलेच्या डोकीला जबर मार बसल्याने तिचा मृत्यू झाला. मात्र सदर मुलगीने विहिरीत सोडलेल्या दोरीचा आधार घेतल्याने ती मात्र बालबाल बचावली आहे. सदर घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव प्रियांका मनोहर पावशे (वय 40) असे असून मुलगीचे नाव अक्षरा मनोहर पावशे असे आहे. सदर घटनेची माहिती अशी की, शेतवडीत जाण्यासाठी घराच्या परसातून पायवाट आहे. या पायवाटेने दोघीही जाताना विहिरीचा काठ आणि बाजूला असलेले मक्याचे पीक यामध्ये अवघ्या दीड फुटाच्या पायवाटेने जाताना न कळत पाय घसरून हा दुर्दैवी अपघात घडला. सदर विहीर 45 फूट खोल असून विहिरीमध्ये दहा फूट पाणी होते. ज्यावेळी त्या दोघीही विहिरीत कोसळल्या त्यावेळी प्रियांकाच्या डोकीला जबर मार बसल्याने ती पाण्यातच कोसळली आणि गतप्राण झाली. मात्र अक्षराने दोरीला घट्ट पकडून जोरजोराने आरडाओरड केल्याने जवळपासच्या घरातील लोक धावून आले आणि तातडीने विहिरीत उतरून तिला वाचविण्यात यश आले. मात्र आईला वाचविण्यात यश आले नाही. अक्षरा पावशे ही इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत आहे. बुधवारी ती शाळेला गेली नव्हती. तर प्रियंका रोज काजू फॅक्टरीमध्ये कामाला जात होत्या. त्याही बुधवारी गेल्या नाहीत आणि ही घटना घडून त्यांच्यावर मृत्यू ओढवला. सदर महिलेला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. या घटनेने उचगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर उचगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.