For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअरमार्केट गुंतवणूक...सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक

11:15 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेअरमार्केट गुंतवणूक   सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक
Advertisement

भरघोस परताव्याचे आमिष : गळाला लागणाऱ्यांत उच्चशिक्षितांचाच भरणा

Advertisement

बेळगाव : शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली अधिकारी, डॉक्टर, उद्योजक आदींची फसवणूक सुरूच आहे. सायबर गुन्हेगारांनी आपल्या गुन्हेगाराची कार्यपद्धत बदलली असून झटपट नफा देण्याचे सांगून धनिकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालण्यात येत आहे. सायबर क्राईम विभागाकडून वारंवार जागृती करूनही असे प्रकार थांबता थांबेनात, अशी परिस्थिती आहे. सायबर गुन्हेगार वरचेवर आपल्या गुन्हेगारीच्या कार्यपद्धतीत बदल करीत असतात. गेल्या सहा महिन्यांपासून आतापर्यंत ‘शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करा, झटपट नफा मिळवा’ अशी जाहिरातबाजी करून धनिकांना गंडविण्याचे प्रकार सुरू आहेत. यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. गेल्या चार महिन्यांत एका बेळगाव शहरातील दहाहून अधिक जणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करण्यासाठी येणाऱ्यांमध्ये डॉक्टर, अभियंते, उद्योजक, सरकारी अधिकारी आदी उच्चशिक्षितांचाच भरणा अधिक आहे. तर जिल्हा सायबर क्राईम विभागाकडे अशा आठहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांना ठकविणाऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान सायबर क्राईम विभागासमोर उभे ठाकले आहे. फसवणुकीसाठी खास करून टेलिग्रामचा वापर केला जात आहे. टेलिग्राम अॅपवरून लिंक पाठविल्या जातात.

‘शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करा आणि झटपट नफा मिळवा’ अशी जाहिरातबाजी केली जाते. एक हजार रुपयाच्या गुंतवणुकीला 1300 रुपये तर दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीला 13 हजार रुपये परतावा दिला जातो. त्यामुळे सावजांना भामट्यांवर विश्वास बसतो. एकदा विश्वास बसल्यावर सावज गुंतवणूक वाढवत जाते. त्यावेळी त्यांचा परतावा त्यांच्या खात्यावर जमा न करता केवळ आकडे फुगवून दाखविले जातात. मोठी रक्कम गुंतविल्यानंतर सर्व संपर्क बंद करून भामटे हात वर करतात. 10 लाखांपासून 55 ते 60 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक झाली आहे. सायबर क्राईम विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार-पाच महिन्यात शेअरमार्केटींगच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर लगेच जर सायबर क्राईम विभागाला माहिती दिली तर गुन्हेगारांचे बँक खाते गोठवून पैसे परत मिळवून देण्यात येत होते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आता सायबर गुन्हेगारांनीही आपल्या कार्यपद्धतीत बदल केले असून ‘गोल्डन हॉवर’मध्येच आपल्या बँक खात्यातील रक्कम अन्य खात्यात वळवतात. त्यामुळे अशी प्रकरणे हाताळणे कठीण जात आहे. फसवणूक होऊ नये यासाठी आता सावधगिरी बाळगणे, खबरदारी घेणे हा एकमेव पर्याय राहिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.