दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या महिलेला अटक
गुजरात एटीएस, बेंगळूर पोलिसांची संयुक्त कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
सातत्याने दहशतवाद्यांच्या संपर्कात राहणाऱ्या महिलेला गुजरात एटीएस आणि बेंगळूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली आहे. संशयित महिलेचे नाव परवीन असे असून ती दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती तपास पथकांना मिळाली होती.
बेंगळूरच्या हेब्बाळ येथील मनोरमा पाळ्या येथे सदर महिला असल्याची माहिती मिळताच गुजरात एटीएस आणि बेंगळूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत महिलेला अटक केली.
अटकेतील महिला सोशल मीडियाच्या माध्यम इन्स्टाग्रामद्वारे संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात होती. मेसेज, कॉल करूनही त्यांच्यात संभाषण होत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. सदर महिलेची चौकशी केल्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मागील आठवड्यात गुजरात एटीएसने केलेल्या कारवाईत अल कायदाच्या संपर्कात असलेल्या झिशान, फरदीन, सैफुल्ला आणि फारुक या चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. यात परवीनचे देखील कनेक्शन असल्याच्या संशयावरून तिला अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसचे डीआयजी सुनील जोश यांच्या माहितीप्रमाणे, अटकेतील संशयित दहशतवादी दीर्घकाळापासून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते. त्यामुळे ही कारवाई दहशतवादाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचे पाऊल आहे.