राजकुमार गोयल होणार नवे मुख्य माहिती आयुक्त
आज घेणार पदाची शपथ : 8 नव्या माहिती आयुक्तांचीही झाली निवड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी आयएएस अधिकारी राजकुमार गोयल हे आज मुख्य माहिती आयुक्त (सीईसी) पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गोयल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने गोयल यांच्या नावाची शिफारस केली होती. गोयल हे अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोरम-केंद्रशासित प्रदेश (एजीएमयूटी) कॅडरच्या 1990 च्या तुकडीचे (सेवानिवृत्त) आयएएस अधिकारी आहेत.
गोयल हे 31 ऑगस्ट रोजी कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अधीन असलेल्या न्याय विभागातील सचिव पदावरून सेवानिवृत्त झाले. गृह मंत्रालयाने सचिव (सीमा व्यवस्थापन) म्हणूनही त्यांनी काम केले असून केंद्र तसेच जम्मू-काश्मीरच्या प्रशासनात त्यांनी महत्त्वपूर्ण पदे भूषविली आहेत.
पंतप्रधना मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीने बुधवारी झालेल्या बैठकीदरम्यान व्रींय माहिती आयोगात 8 माहिती आयुक्तांच्या नावांचीही शिफारस केली आहे. नवे मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांनी कार्यभार स्वीकारल्यावर 9 वर्षांपेक्षा अधिक काळानंतर आयोग पूर्ण क्षमतेने काम करणार आहे. आयोगाचे अध्यक्षत्व मुख्य माहिती आयुक्त करतात तर आयोगात कमाल 10 माहिती आयुक्त असू शकतात. वर्तमानात आनंदी रामलिंगम आणि विनोद कुमार तिवारी हे माहिती आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
माहिती आयुक्ताच्या स्वरुपात नियुक्तीची शिफारस
रेल्वे बोर्डाच्या माजी प्रमुख जया वर्मा सिन्हा, माजी आयपीएस अधिकारी स्वागत दास, माजी केंद्रीय सचिवालय सेवा अधिकारी संजीव कुमार जिंदर, माज आयएएस अधिकारी सुरेंद्र सिंह मीणा आणि भारतीय वनसेवेचे माजी अधिकारी खुशवंत सिंह सेठी यांच्या नावांची शिफारस माहिती आयुक्त म्हणून नियुक्तीसाठी करण्यात आली आहे. समितीने वरिष्ठ पत्रकार पी.आर. रमेश आणि आशुतोष चतुर्वेदी तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक बोर्डाच्या सदस्या सुधा रानी रेलंगी यांनाही माहिती आयुक्त म्हणून नियुक्तीसाठी निवडले आहे. हे 8 माहिती आयुक्त नव्या मुख्य माहिती आयुक्तांसमक्ष पदाची शपथ घेणार आहेत.