‘वक्फ’प्रकरणी बजावलेल्या नोटिसा तात्काळ मागे घ्या!
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या कडक सूचना : वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक, शेतकऱ्यांना दिलासा
प्रतिनिधी/ बेंगळूर
वक्फबाबत शेतकऱ्यांना बजावलेल्या नोटिसा तात्काळ मागे घ्याव्यात. तसेच यापुढे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशा कडक सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी महसूल, अल्पसंख्याक कल्याण खाते आणि वक्फ बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रदीर्घ बैठक घेतली.
वक्फ जमीन प्रकरणातील अलीकडच्या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त करताना काही अधिकाऱ्यांनी नोटीस बजावून केलेल्या कारवाईबाबतही सिद्धरामय्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच त्यांनी घडामोडींची संपूर्ण माहिती घेतली. विरोधी पक्ष वक्फ मुद्याचा राजकारणासाठी वापर करत असून राज्यातील शांतता बिघडवण्याचा दुष्ट प्रयत्न करत आहेत. यावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केली. तसेच अपप्रचारकडेही लक्ष न देण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनीही याबाबत खबरदारी घ्यावी. शेतकऱ्यांना त्रास होईल असा कोणताही निर्णय घेऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले.
यावेळी कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील, महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा, प्रधान सचिव राजेंद्र कटारिया, मुख्यमंत्र्यांचे कायदेशीर सल्लागार पोन्नण्णा, वक्फ बोर्डाचे सीईओ जिलानी, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव नसीर अहमद, अल्पसंख्याक कल्याण खात्याचे सचिव मनोज जैन आदी उपस्थित होते.
बैठकीत घेतलेले निर्णय
- शेतकऱ्यांच्या उताऱ्यातील बदलाबाबत यापूर्वी जारी करण्यात आलेल्या नोटिसा तात्काळ मागे घेण्यात याव्यात.
- शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनींना कोणत्याही प्रकारच्या दुऊस्त्या करून त्यांना कोणताही त्रास होऊ नये याकडे लक्ष द्या.
- बेकायदेशीरपणे व नोटीस न देता उताऱ्यात कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली असल्यास ती तात्काळ रद्द करावी.
लवकरच कागदपत्रे उघड करणार : सिद्धरामय्या
यापूर्वी बी. एस. येडियुरप्पा आणि एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या मालमत्ता वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भातील कागदपत्रे लवकरच उघड करणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’ या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी आपणच खुल्या चर्चेला येईन, असे विजयेंद्र यांच्या आव्हानाला उत्तर देताना भाजप सत्तेवर असताना वक्फ खात्यातील बदलाची कागदपत्रे जाहीर करू, असे सांगितले.