अपघातग्रस्त वाहनात बेकायदेशीर 15 जनावरे
अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळेगुळ्ळी फाट्यावर घटना उघडकीस : चौकशीची मागणी
कारवार : अपघातग्रस्त वाहनामध्ये बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात येत असलेली 15 जनावरे आढळून आल्याची घटना अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळेगुळ्ळी फाट्यावर उघडकीस आली आहे. या प्रकरणाबद्दल अधिक माहिती अशी, हुबळी-अंकोला राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वरील बाळेगुळ्ळी फाट्यावर नादुरुस्त झालेले वाहन थांबले होते. त्यावेळी हुबळीहून अंकोलाकडे निघालेल्या अन्य एका वाहनाने नादुरुस्त झालेल्या वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच अंकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन धडक दिलेल्या वाहनात बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत असलेली 15 जनावरे आढळून आली. यामध्ये 9 म्हशी, 4 रेडे आणि 2 बैलांचा समावेश आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होताच वाहनचालकाने तेथून पलायन केले.
त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या जनावरांची कुठून कुठे वाहतूक करण्यात येत होती हे समजू शकले नाही. फरारी झालेल्या चालकाचा पोलीस कसून शोध घेत आहेत. सदर जनावरे कत्तलखान्याकडे नेण्यात येत होती, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जप्त केलेली जनावरे अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठेवण्यात आली आहेत. दिवाळीच्या सणामध्ये जनावरांची वाहतूक कत्तलखान्याकडे केली जात होती, असा संशय बळावल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. काही पशुप्रेमींनी जप्त केलेल्या जनावरांना चारा, पाण्याची व्यवस्था केली आहे. जनावरांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. वाहनाचा नोंदणी क्रमांक चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला होता, असे सांगण्यात आले. अंकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.
केरळ, मंगळूरकडे जनावरांची वाहतूक
दरम्यान जिल्ह्यातील राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 आणि 66 वरून केरळ आणि मंगळूरकडे जनावरांची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते, अशी तक्रार केली जात आहे. अपघात झाला नसता तर 15 जनावरे कत्तलखान्याच्या आहारी गेली असती. जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील विशेष करून भटकळ तालुक्यातील रस्त्यावर मुक्काम ठोकून, मोकाट जनावरांची चोरटी वाहतूक केली जात आहे, अशी तक्रार केली जात आहे. जनावर वाहतूक प्रकरणाची कसून चौकशी करावी, अशी मागणीही जिल्हावासियांकडून केली जात आहे.