कोरोनीलसंबंधी दावे मागे घ्या !
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनील या औषधाने कोरोना बरा होतो, हा दावा मागे घ्या, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने योगगुरु रामदेवबाबा यांच्या कंपनीला दिला आहे. कोरोनील हा कोरोनावरील उपाय आहे, अशी जाहीरात करण्याचा किंवा तसा दावा करण्याचा या कंपनीला अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
रामदेव बाबांच्या कंपनीने असा दावा एक्स या माध्यमावरुन केला होता. त्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी करुन कंपनीला हा आदेश दिला. जर या आदेशाचे पालन झाले नाही, तर एक्स या माध्यमाने असा दावा करणारा संदेश काढून टाकावा, असाही आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. दावा काढून घेण्यासाठी न्यायालयाने तीन दिवसांचा कालावधी दिला आहे. कोरोनील या औषधामुळे कोरोना बरा होतो, असा दावा रामदेवबाबांनी कोणत्याही परिक्षणाशिवाय आणि अधिकृत अनुमती आणि प्रमाणपत्राशिवाय केल्याचा आरोप करण्यात आला होता.