महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इराण बॅकफूटवर, खेमनेईचे काही चालेना

06:30 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्त्रायलने इराणमध्ये घुसून हमास प्रमुख इस्माईल हनिए यांचा खात्मा केला. इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला अली खेमनेई यांची गळाभेट घेतल्यानंतर केवळ बारा तासांच्या आत हनिए यांच्या खोलीत दोन महिन्यापूर्वी पेरून ठेवलेल्या बॉम्बचा धमाका करून इस्त्रायलने संपूर्ण इस्लामिक जगताला हादरवून सोडले. या घटनेनंतर केवळ 72 तासांत इस्त्रायलचा बदला घेण्याची घोषणा इराणने केली होती. मात्र घटनेला महिना होत आला तरी इराणच्या आघाडीवर सामसूम पसरली असून इराण समर्थित अतिरेकी संघटना कमालीच्या अस्वस्थ बनलेल्या आहेत.

Advertisement

आयातुल्ला अली खेमनेई यांनी इस्माईल हनिए यांच्या हत्येचा बदला घेण्याची घोषणा केली होती. इराणच्या सर्वोच्च नेत्याने केलेल्या घोषणेची अवमानना कधी तेथील राष्ट्राध्यक्ष अथवा इराणच्या रेवेल्युशनरी गार्डने कधी केली नव्हती. पण खेमनेई यांनी युद्धाची धमकी दिल्यानंतर 20 दिवस उलटले तरी युद्धाची कोणतीही हालचाल इराणकडून दिसत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. अर्थात इराणने माघार घेतली अशातला भाग नसून बदललेल्या राजकीय धुरीणांचा हा परिणाम असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेल्या निधनानंतर राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान डॉ. मसूद पेझेशिकयान यांची मवाळ व संवेदनशील कुटनिती यासाठी कारणीभूत ठरलेली आहे.

Advertisement

डॉ. मसूद यांनी निवडणूक काळात जनतेला इराणवरील पश्चिमी देशांचे सर्वप्रकारचे निर्बंध हटविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठीच त्यांच्या शपथविधी सोहळ्यात खास निमंत्रित म्हणून उपस्थित असलेल्या हमासचे प्रमुख इस्माईल हनिए यांच्या हत्येप्रकरणी इस्त्रायलवर थेट हल्ला करण्याची पद्धती न अंगिकारता काट्याने काटा काढण्याची रणनिती आखण्याची योजना तयार केली जात आहे. इस्त्रायलच्या मोसाद या गुप्तचर संघटनेने हमास प्रमुख हनिए यांना ठार केल्यानंतर दोन दिवसांच्या अंतराने इराणशी लागेबंध असलेली हैथी, हिजबुल्ला, हमास व अन्य अतिरेकी संघटनांच्या प्रमुख नेत्यांची तेहरानमध्ये बैठक झाली. यात इराणच्या रेवेल्युशनरी फोर्सच्या कमांडरनी इस्त्रायलविरोधात थेट युद्ध न लढता त्यांच्याच रणनितीचा वापर करत पेलेस्टाईनच्या दुर्गतीला कारणीभूत इस्त्रायली नेत्यांच्या हत्येचा कट अमलात आणण्याचा इरादा स्पष्ट केला. मात्र विविध अतिरेकी गट आपल्या इस्त्रायलविरोधी कारवाया कायम ठेवतील असेही या बैठकीत ठरविण्यात आले. इराण सरकारचा हा प्रस्ताव अनेक अतिरेकी संघटनांना मान्य न झाल्याने बैठकीत विविध गटांत जोरदार खडाजंगी झाली व काही संघटनांचे प्रमुख ही बैठक सोडून गेल्याचे सांगितले जाते.

इस्माईल हनिएच्या हत्येनंतर बदला घेतला जाईल, असे इराणी नेत्यांनी घोषित केल्यानंतर अमेरिकन प्रशासनाने इस्त्रायलला पूर्ण संरक्षण पुरविण्याची हमी दिली. त्यानुसार अमेरिकेने आपल्या 50 हजार सैनिकांना इराण आणि इस्त्रायलजवळ तैनात केले. रोनाल्ड रिगन ही विमानवाहू युद्धनौका पर्शियन गल्फमध्ये आणण्यात आली. इस्त्रायलने सुट्टीवर गेलेल्या व इतरत्र व्यस्त असलेल्या आपल्या सैनिकांना माघारी बोलावले. अमेरिकेने इस्त्रायलबरोबर 20 अब्ज डॉलर्सचा शस्त्र विक्री करार पूर्ण करून आपल्या शस्त्र विक्रीच्या धंद्याला या निमित्ताने चालना दिली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन हे मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी विविध देशांच्या भेटीवर येणार होते. मात्र इराणकडून कोणतीही आगळीक झाली नसल्याने त्यांनी आपली भेट रद्द केली.  इराणी सैन्य इस्त्रायलवर युद्ध करण्याच्या तयारीत नसल्याने इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला अली खेमनेई यांनी निराशा व्यक्त करत बदला न घेतल्यास अल्ला माफ करणार नसल्याचे उद्गार काढले. खेमनेईच्या या उद्गारामुळे त्यांच्यातील निराशा जगजाहीर झाली. यापूर्वी प्रत्येकवेळी खेमनेई यांनी केलेली घोषणा केवळ 72 तासांत अमलात आणलेल्या आहेत. त्यांनी अनेक जागतिक नेत्यांच्या शिरच्छेदाचे दिलेले आदेश इराणी गुप्तचर यंत्रणा अथवा इराण समर्थक अतिरेकी संघटनांनी अमलात आणलेल्या आहेत. तसेच त्यांच्या घोषणेनंतर अनेक युद्धांनाही प्रारंभ झालेला होता. यावेळी मात्र त्यांनी केलेली इस्त्रायलविरोधी घोषणा हवेतच विरून गेली.

इस्त्रायलने 30 जुलै रोजी इराणमध्ये घुसून हमास प्रमुखाचा खात्मा केल्यानंतर एका वेगळ्याच वातावरणाची निर्मिती झालेली आहे. हनिएच्या घातपातानंतर जगात एक भयभीत वातावरण निर्माण झाले होते. इराणने युद्धाचे बिगुल फुंकल्यानंतर तुर्की, येमेन, लेबनॉन व अन्य काही इस्लामिक देश त्यात सहभागी होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांत कमालीचा तणाव निर्माण झाला होता. सध्या युरोपियन देश प्रचंड महागाईने त्रस्त झालेले आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आगडोंब उडालेला आहे. अशा स्थितीत इस्त्रायल व अन्य काही इस्लामिक देशांत युद्ध भडकल्यास ते जड जाणार असल्याने ते टाळण्यासाठी अमेरिकेसहीत सर्व नाटो देश सक्रीय बनले होते. आता महिना होत आला तरी युद्धाचे सावट काही दिसत नसल्याने अनेक देशांनी सुस्कारा सोडलेला आहे.

महिन्याभरापूर्वी इस्त्रायलविरोधात सूर काढणाऱ्या युरोपियन देशांची दातखिळी बसली असून तो बदलत्या वातावरणाचा परिणाम आहे. हमास प्रमुख इस्माईल हनिएच्या निर्घृण हत्येनंतर हमास आता अल् कायदाप्रमाणेच रसातळाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच आतापर्यंत संपूर्ण जगावर दहशत निर्माण करणारा आणि शिरच्छेदाचे फतवे जाहीर करणाऱ्या आयातुल्ला अली खेमनेई यांना त्यांची जागा दाखवून देणाऱ्या चिमुकल्या जिद्दी इस्त्रायलचा दबदबा जगात भारी ठरला आहे.

- प्रशांत कामत

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article