महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सुजाण पालकत्व

06:30 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

त्या दिवशी सकाळीच रेवतीचा फोन आला तो तक्रारींच्या सुरातच.. मॅडम, मयंक अजिबात ऐकत नाही. नुसती मस्ती करतो. अक्षरश: कंटाळा आणला या मुलाने!कुणी म्हणतं, ‘मुलं म्हणजे मातीचा गोळा. जसा आकार देऊ तसाच आकार घेणार. कसलं काय हो.. यांना आकार देता देता आम्हांला विकार व्हायची वेळ आली. मी हसू आवरतं म्हटलं..बरं..किती वर्षांचा आहे? अडीच वर्ष. जरा ऐकत नाही. एका जागी स्वस्थ बसेल तर शपथ..अहो.मस्ती करायचंच वय आहे त्यांचं..

Advertisement

होय हो..पण खूपच वळवळ्या आहे. कसली म्हणून भीती नाही..मला भेटायचंच आहे तुम्हाला...ठीक आहे म्हणत मी भेटीची वेळ दिली आणि फोन ठेवला.

Advertisement

अनेक पालकांजवळ संपर्क येत असतो. वेगवेगळ्या पध्दतीने पालक व्यक्त होत असतात. एकदा एका टीन एजरची आई वैतागत म्हणाली, ‘मॅडम..वैताग आलाय..म्हणे मुलं म्हणजे देवाघरची फुलं...कसलं काय. इतकं हैराण करतात, की काही विचारु नका. सर्वांशी जुळवून घेणं परवडलं पण या वयात येणाऱ्या मुलांसोबत जुळवून घेणं नकोच वाटतं.

कुणी पालक, मुलं ऐकतच कसं नाहीत हे सांगतात तर कुणी..बारा बारा वर्षांचे झाले तरी मॅच्युरीटी कशी ती नाही याचं सविस्तर वर्णन करतात. अनेक तक्रारी समोर येतात. मुलांनी अगदी व्यवस्थितच व्हायला हवं म्हणून अगदी काटेकोर असणारे, आम्ही मुलांना इतकं देतो त्यांनी तसे रिझल्ट दिलेच पाहिजेत असं म्हणणारे तर काही, कश्शा कश्शाची झळ लागू नये त्याला ..असं म्हणत खूप सावध पवित्रा घेणारे पालकही भेटत असतात.

काहीवेळा मुलांची खरंच एखादी समस्या असते तर काहीवेळा समस्या, मुले आणि पालक यांचा एकत्रित विचार करताना असं चित्र दिसतं की, मुलांच्या समस्या घेऊन येणाऱ्या पालकांच्या मुलांपेक्षा अधिक समस्या असतात आणि अनेकदा पालकांना त्याची जाणीवही नसते.

अर्थात अलीकडच्या काळात सर्व प्रकारच्या समस्या वाढल्या आहेत हे खरे आहे परंतु त्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेला दृष्टीकोन आणि लवचिकता पालकांमध्ये नसेल तर त्यामधून अनेक नवीन समस्या जन्म घेतात. एकंदरच मुलं-पालक यांच्या विश्वात वेगवेगळ्या प्रकारची अस्वस्थता पहायला मिळते. चिंता, भीती, निराशा, अपेक्षाभंग, न्युनगंड, हतबलता, ताणतणाव असं चित्र खूपदा पहायला मिळतं.

खरंतर चांगलं पालक होणं ही एक कलाच आहे. पालक-पाल्य संबंध म्हणजे ‘एखादं समीकरण नव्हे की, जे विशिष्ट सुत्रांनी सोडवता येईल. ‘मुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर ते बदलत असते. पालकांसाठी तो वेगळा अनुभव असतो. कधी सुखकारक, कधी तणाव, प्रेम-वेदना, कधी आनंद यांचं ते अनोखं मिश्रण असतं. ‘मुलं म्हणजे मातीचा गोळा’ हे म्हणायला ठीक परंतु पालक म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की माती आणि मुल यात फरक आहे. आपण सजीव आहोत. प्रत्येक मुल स्वतंत्र आणि सतत बदलणारं व्यक्तिमत्व घेऊन वाढत असतं. आपले संस्कार, संगोपन मुलांना मोलाचा आकार देत असतं परंतु, त्याबरोबरच अनुवंशाने जे त्याला मिळाले आहे ते, आजूबाजूची परिस्थिती/संस्कृती, निसर्गत: मिळालेली एखादी क्षमता/खासियत हे सर्व घटक म्हणजेच नेचर, नर्चर, कल्चर आणि युनिकनेस या चारही गोष्टीतून व्यक्तिमत्व आकार घेत असते.

अनेकदा आपलं मुल असं वागलंच कसं? हा प्रश्न घेऊन पालक समोर येतात. बऱ्याच वेळा लोकं आम्हाला काय म्हणतील? हा भावही त्यात मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतो.

एखादा मुलगा वा मुलगी अती हळवा, अतीरागीट, भित्रा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणी घेऊनही पालक समोर येतात.

खरंतर आपण, मुलांची शाळा, अभ्यास, मार्क्स् अर्थात अभ्यासातील गुणवत्ता यावर लक्ष ठेवून असतो. परंतु यासोबतच किंबहुना त्याहून कणभर अधिकच मुलांच्या भावनांना योग्य वळण कसे लावता येईल आणि भावनिक हुशारी कशी वाढवता येईल याबाबत सुरवातीपासून सजग राहणे गरजेचे आहे.

एखाद्या वेळी आपलं मुल चुकीचं वागलं तर लगेच त्याचं कठोर शब्दांत कोर्टमार्शल करण्याऐवजी तो/ती काय म्हणतो/म्हणते आहे, हे शांतपणे त्यांच्या भावनांशी समरस होऊन ऐकुन घेणे गरजेचे आहे.

कुणाचे काय चुकले? कुणाच्या वळणांवर गेलास? अशा प्रश्नांपेक्षा कसे चुकले आणि चूक टाळण्यासाठी आपण काय करु शकतो? अशा भूमिकेने पुढे गेल्यास मुलांमध्येही पालकांबद्दल विश्वास निर्माण होतो. प्रश्न निर्माणच कसा झाला वा कुणी निर्माण केला? यापेक्षा त्या प्रश्नाचं नेमकं स्वरुप समजावून घेतलं तर तो प्रश्न सोडवणे सोपे होते. अनेकदा मुलांमधील वैचारिक गोंधळातून अनेक प्रश्न निर्माण होत असतात. तो वैचारिक गोंधळ दूर करण्यासाठी नीट समजून घेणं गरजेचं आहे.

जीवनाची अफाट गती, खूप स्पर्धा, त्यात टिकण्यासाठी कमालीचा आटापीटा या साऱ्यामध्ये मुलंही विविध समस्यांना सामोरी जात असतात. मॅच्युरीटी कशी ती नाही असं म्हणत असताना मुलांच्या वाढीचे नैसर्गिक टप्पे लक्षात न घेता स्पर्धेच्या युगात टिकायचे म्हणून एकदम वरचा टप्पा गाठण्यासाठी आपण त्यांना यंत्रवत तर बनवत नाही ना? याचा प्रामाणिक विचार गरजेचा आहे. शैक्षणिक विकासाचा टप्पा गाठणे आवश्यक आहेच परंतु तो गाठत असताना त्यांच्यावर खूप बंधनं लादत, सतत दबाव टाकत त्यांना भावनिक विकासाच्या बाबतीत कळत-नकळत पंगुत्वाकडे तर नेत नाही ना हे पाहणेही आवश्यक आहे.

खेळ, प्रयोग, चुका यातून मिळणाऱ्या शिक्षणाचे महत्त्व व्यक्तिमत्व विकासात खूप मोलाचे आहे हे ही लक्षात घ्यायला हवे. दुसऱ्यांसोबत तुलना करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की प्रत्येक मुलाची विकासाची गती, कौशल्य, वैशिष्ट्या वेगवेगळी असतात. कुणी बिनचूक नसतं. पालक म्हणून आपण तरी शंभरटक्के अचूक कुठे असतो? मुलांना वाढवत असताना कधी चुकत चुकत आपणही शिकत असतोच की..

पालक आणि शिक्षक या दोन व्यक्ती मुलांच्या विकासात खूप मोलाची भूमिका बजावत असतात. त्यांचे शब्द, कृती, प्रतिक्रिया या मुलांच्या विकासासाठी फार महत्त्वाच्या असतात. मुलांची निरीक्षण शक्ती अफाट असते. त्यामुळे पालक म्हणून आपलंही वर्तन कसं असायला हवं याचा प्रामाणिक विचार गरजेचा आहे. माझ्या मित्राच्या वा मैत्रिणीच्या मुलाला एवढे मार्क्स मिळाले मग माझ्याच मुलाला का नाहीत? या किंवा अशा पध्दतीच्या अनेक गोष्टींची तुलना कळत नकळत आपण करत असतो. आपलं मुल सर्वार्थानं यशस्वी व्हावं ही इच्छा असणं यात वावगं काही नाही परंतु मुलांची क्षमता, आवड हे सारं लक्षात घेऊन त्या दिशेने वाटचाल झाली तर यशस्वीतेचा टप्पा गाठणे अवघड नाही. अर्थात सुजाण पालकत्व, पालक पाल्य संबंध हा विषय एकाच लेखात मांडणे अवघड आहे. मुलांचा कल, क्षमता, ध्येयनिश्चीती या गोष्टींबाबतही पालक म्हणून सजग असणे ही काळाची गरज आहे. सर्व गोष्टींचा सारासार विचार आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत हा आश्वासक भाव मुलांमध्ये निर्माण केला तर अनेक समस्या सोडविणे सोपे जाईल हे मात्र खरे!!

अॅड. सुमेधा संजिव देसाई

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article