For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आनंदाची वारी

06:54 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
आनंदाची वारी
Advertisement

वारी म्हणजे आनंदाचा, चैतन्याचा, लाडक्या विठुरायाच्या भेटीचा सुखसोहळा होय. पवित्र चंद्रभागेच्या साक्षीने व लाखो वारकऱ्यांच्या मांदियाळीत तीर्थ पंढरपुरीत  रंगणारा हा सोहळा यंदाही विशेष असेल. खरंतर हा सोहळा हे भूतलावरचे महद् आश्चर्यच मानावे लागेल. मागच्या शेकडो वर्षांपासून वारीची ही परंपरा निरंतरपणे सुरू आहे. कोरोना वा तत्सम साथींचा अपवाद वगळता या सोहळ्यात कधी खंड पडलेला नाही. वारी अव्याहतपणे, अविरतपणे सुरूच आहे. वारीचा उगम नेमका केव्हा व कधी झाला, याविषयी मतमतांतरे दिसतात. ज्ञानोबा, तुकोबांच्या आधीही वारीची परंपरा असल्याचे सांगण्यात येते. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या मतानुसार वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांनीही वारीची परंपरा पुढे चालवली. स्वत: तुकाराम महाराज हे शुद्ध एकादशीस टाळकऱ्यांना घेऊन पंढरीला जात असल्याचे दाखले दिले जातात. तुकेबांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे ऊपांतर पालखी सोहळ्यात केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पालखी सोहळ्याचे जनक म्हणून नारायण महाराज यांचा उल्लेख केला जातो. आधी तुकोबारायांच्या पादुका श्री देहू क्षेत्रावरून पालखीत घालून श्री क्षेत्र आळंदीत आणल्या जायच्या व तेथून ज्ञानोबा व तुकोबा दोघांच्या पादुका एकत्रित पंढरीकडे नेल्या जात असत. त्यानंतर श्रीगुरू हैबतबाबा यांनी माऊलींचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला. वारीला खऱ्या अर्थाने उत्सवी रूप देण्याचे काम हैबतबाबांनी केले. अशा या पालखी सोहळ्याची व्याप्ती दिवसागणिक वाढतच आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या. अनेक स्थित्यंतरे घडली. परंतु, वारीविषयीची ओढ, कुतूहल तसूभरही कमी झालेले नाही. वारीचा ओघ किंचितभरही आटलेला नाही. उलट हा वेलू गगनावरी पोहोचला असल्याचे दिसून येते.   पंढरीची वारी । आहे माझे घरी । आणिक न करी । तीर्थव्रत ।। ही वारकऱ्यांची धारणा आहे. हा भाव बाळगूनच लाखो वारकरी दरवषी वारीत सहभागी होत असतात. ना कोणता सांगावा ना कोणता निरोप. केवळ विठोबाच्या आत्मिक  लळ्यापोटीच वारकऱ्यांची पावले आषाढी वारीच्या वाटेकडे वळत असतात. देहूहून तुकोबांची, तर आळंदीतून ज्ञानोबांची पालखी निघते. याशिवाय ठिकठिकाणांहून विविध संतांच्या पालख्या निघतात. त्यानंतर वाखरीमध्ये सर्व पालख्यांचा संगम होतो. भक्तीच्या मेळ्याला महामेळ्याचे स्वऊप प्राप्त होते. यंदाही वाखरीत हाच भक्तीचा सागर अनुभवायला मिळाला. हा संतभार पंढरीत एकवटलेला पाहणे, व चंद्रभागेतीरी आनंदाच्या डोही आनंद तरंग, ही अनुभूती घेणे हे स्वर्गसुखच. पांडुरंगाची भेट हा वारकऱ्यांसाठी परमोच्च आनंदाचा बिंदू, तर आषाढी एकादशी हा दसरा दिवाळीपेक्षाही आनंदाचा सण. उद्या हे दोन्ही योग जुळून येतील.  त्यामुळे याची देही याची डोळा विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी आतुरलेले असतील. दरवर्षी पंढरपुरात दहा ते बारा लाख वारकरी एकवटत असतात. यातील प्रत्येकाला विठ्ठलाचे दर्शन मिळतेच असे नाही. अनेक जण कळस दर्शन घेऊनच माघारी फिरतात. परंतु, तरीही विठ्ठलभेटीचा आनंद वारकऱ्यांना मिळतो, तो त्यांच्यातील अद्वैतानुभवातून. विठ्ठल ठायी ठायी आहे, हीच वारकऱ्यांची भावना असते. सावता महाराजांसारखे संत तर कधी पंढरपूरला गेलेच नाही. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी...हाच संत सावता महाराजांचा ध्यास होता. ते निसर्गाशी, झाडामाडांशी इतके एकरूप झाले होते, त्यात त्यांना पांडुरंगाचे दर्शन घडत असे. त्यामुळे पंढरपुरात येऊन पांडुरंगाचे वेगळे दर्शन घेण्याची गरज त्यांना वाटली नसावी. निसर्गाच्या कणाकणात पांडुरंग आहे, सत्कर्मात पांडुरंग आहे, हाच याचा अर्थ. हा अर्थ नव्याने समजून घ्यायला हवा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम । अमंगळ ।। असे संत तुकोबाराय म्हणतात. वारीमध्ये उच्च, नीच भेदाला स्थान नाही. कुणाही जीवाचा न घडो मत्सर, हा येथील विचार आहे. हा विचार पुढे घेऊनच वारकरी संप्रदाय पुढे जात आहे. आज जगभर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. संवाद नावापुरताही शिल्लक राहिलेला नाही. त्याऐवजी ऐकीव, सांगोवागीच्या गोष्टींवरच विश्वास ठेवण्यात धन्यता मानली जात आहे. त्यामुळे माणसामाणसांतील, नात्यागोत्यांतील साहचर्य हरवत चालले आहे. हे विस्कटलेपण, संशयाचे भूत पिटाळून लावण्याचे सामर्थ्य कशात असेल, तर ते आहे संतविचारात. संतविचारात भोंदूगिरीला स्थान नाही. अशा प्रवृत्तींना ऐसे कैसे झाले भोंदू, असा सवाल करीत हा विचार विरोध करतो. मन करा रे प्र्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, असा मानसशास्त्रीय दृष्टीकोनही संतवाङ्मयातच आढळून येतो. म्हणूनच नव्या पिढीलाही हा विचारधर्म, आचारधर्म समजून घ्यावा लागेल. वारीची वाट अशी आनंदमय होत असताना मोसमी पावसानेही त्यात रंग भरलेले दिसतात. जूनमध्ये ताण दिलेल्या पावसाने जुलैमध्ये सर्वदूर चांगली हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागच्या काही दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे राज्यातील आटलेल्या जलाशयांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागल्याचे दिसते. देशातील शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. पावसाने कृपा केल्याने शेती व शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मान्सूनचा पाऊस व कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थकारणातील दोन महत्त्वाचे घटक मानले जातात. सध्याची स्थिती पाहता कृषी उत्पादनाबाबत नक्कीच आशा बाळगता येईल. यंदा 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढच्या टप्प्यात पाऊस कसा राहतो, यावरही बरेच गणित अवलंबून असेल. अर्थात वऊणराजाच्या साथसंगतीमुळे यंदाच्या वारीचा आनंद द्विगुणित झालेला पहायला मिळतो. ‘होय होय वारकरी  । पाहे पाहे रे पंढरी ।’ हा प्रत्येक वारकऱ्याचा ध्यास असतो. तर ‘माझ्या जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।’ ही त्याची आस असते. विठुभेटीची ही आस पूर्णत्वास जाणे, यासारखा दुसरा आनंद नाही. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा!

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.