विप्रो, एचसीएल टेकचे तिमाही निकाल जाहीर
वृत्तसंस्था/ बेंगळूर
आयटीतील दिग्गज कंपनी विप्रोने आपला डिसेंबर तिमाहीचा निकाल जाहीर केला असून वर्षाच्या आधारावर पाहता नफा 12 टक्के इतका घटला आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीअखेर विप्रो कंपनीने 2694 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी या अवधीमध्ये कंपनीने 3065 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे, की सलग चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा वर्षाच्या आधारावर पाहता घटत आला आहे. तिमाही स्तरावर पाहता कंपनीचा नफा 1.2 टक्के वाढलेला आहे. पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीने 2667 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. डिसेंबरच्या तिमाहीमध्ये कंपनीचा एकत्रित महसूल वर्षाच्या आधारावर 4 टक्के घटत 22 हजार 205 कोटी रुपये इतका राहिला होता. गेल्या वर्षी समान अवधीमध्ये कंपनीने 22,229 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. गुरुवारी विप्रोचा समभाग जवळपास चार टक्के वाढत 446 रुपयांवर बंद झाला. समभागाने गेल्या एक वर्षभरामध्ये 18 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे.
एचसीएलच्या महसुलात वाढ
दुसरीकडे आणखीन एक आयटी क्षेत्रातील कंपनी एचसीएल टेकने सुद्धा आपला तिमाही निकाल जाहीर केला असून डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीने 28 हजार 446 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. वर्षाच्या आधारावर पाहता महसुलामध्ये कंपनीने 6 टक्के वाढ केली आहे. एक वर्ष आधी समान तिमाहीमध्ये कंपनीने 26 हजार 700 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीने 3818 नव्या उमेदवारांना कंपनीत नोकरीवर सामावून घेतले आहे. यायोगे एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2 लाख 24 हजार 756 इतकी झाली आहे. एचसीएल टेकचे समभाग शुक्रवारी 4.65 टक्के वाढत 1553 रुपयांवर बंद झाले होते. एक वर्षाच्या कालावधीमध्ये या समभागाने 44 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे.