For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिवाळी अधिवेशन; बेळगावकरांना टेन्शन!

10:38 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
हिवाळी अधिवेशन  बेळगावकरांना टेन्शन
Advertisement

उत्तर कर्नाटकला नेहमीच ठेंगा : शहराच्या समस्या जैसे थे, वाहतूक कोंडीमुळे जनता मेटाकुटीला

Advertisement

बेळगाव : बेळगावमध्ये अधिवेशन घेतल्यामुळे बेळगावातील समस्या गंभीर बनत चालल्या आहेत. यामागचे कारण म्हणजे सर्व अधिकारी अधिवेशनामध्ये गुंतत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. जनतेच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी अधिवेशन भरविले जाते. मात्र, या अधिवेशनामुळेच समस्या निर्माण होत आहेत, अशा तक्रारी आता वाढू लागल्या आहेत. विविध कामांसाठी ग्रामीण भागासह शहरातील जनता शासकीय कार्यालयात गेली असता सध्या अधिवेशन सुरू आहे, 15 तारखेनंतर या, असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे अधिवेशन हीच बेळगावच्या जनतेची डोकेदुखी ठरू लागली आहे. उत्तर कर्नाटकच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी अधिवेशन बेळगावात भरविले जाते, असे वारंवार सांगण्यात येते. आतापर्यंतच्या अधिवेशनांमधून उत्तर कर्नाटकचा तर सोडा साध्या बेळगावचाही विकास झाला नाही. त्यामुळे बेळगावातील जनता अधिवेशनच नको, असे म्हणू लागली आहे. अधिवेशनाच्या कामासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना जुंपण्यात आले आहे. त्यामुळे प्रलंबित असलेली कामे तसेच सर्वसामान्य जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. शहरातील जनता ड्रेनेज, कचरा आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे अक्षरश: मेटाकुटीला आली आहे. या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी वारंवार होत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पाणीपुरवठाही सुरळीत होत नाही. काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे काविळीसारख्या आजारांना बेळगावातील जनतेला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, सध्या अधिवेशनाच्या कामामुळे या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे. बेळगावातील जनतेला अनेक समस्या भेडसावत असताना त्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अधिवेशन नेमके कशासाठी भरविले जाते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर बेळगावच्या जनतेला त्रास होत असेल तर अधिवेशनच भरवू नका, असा सूर आता उमटू लागला आहे.

बेळगावच्या जनतेतून नाराजी

Advertisement

अधिवेशनामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. मंत्रिमहोदय तसेच इतर अधिकारी जात असताना वाहतूक अडविली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. या कोंडीमुळे जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या अधिवेशनाचा बेळगावला तरी काहीच फायदा नाही. त्यामुळे अधिवेशनच नको, असे जनतेचे म्हणणे आहे. बेळगावात अधिवेशन घेत असाल तर बेळगावच्या विकासाबाबत काही तरी ठोस निर्णय एखाद्या अधिवेशनामध्ये तरी घेण्यात आला का? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. एकूणच अधिवेशनामुळे बेळगावच्या जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.