देखावे पाहण्यासाठी शहरात गर्दी
मध्यरात्री उशिरापर्यंत गणेशभक्तांचा उत्साह, खाद्यपदार्थांची रेलचेल
बेळगाव : हलते देखावे हे बेळगावच्या गणेशोत्सवाचे एक वैशिष्ट्या आहे. दरवर्षी काही मंडळे सामाजिक, धार्मिक पार्श्वभूमीवर देखावे सादर करीत असतात. यावर्षीही अनेक मंडळांनी देखावे सादर केले असून ते पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे. सायंकाळी 7 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत बेळगावचे रस्ते गर्दीने फुलू लागले आहेत.
यावर्षी बेळगावमध्ये नावीन्यपूर्ण गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. भव्यदिव्य आणि सुबक गणेशमूर्ती पाहण्यासाठी बेळगावसह चंदगड, खानापूर व आसपासचे नागरिक गर्दी करीत आहेत. लहान मुलांसह तरुणाई व वयोवृद्ध गणेश दर्शनासाठी शहरात येत आहेत. बेळगाव शहरासह टिळकवाडी, अनगोळ, शहापूर, शिवाजीनगर, गांधीनगर या परिसरात गर्दी उसळत असल्याचे दिसून येत आहे.
एसपीएम रोड गणेशोत्सव मंडळाने हलता देखावा सादर केला आहे. टिळकवाडी येथील हिंदूनगर येथील मंडळाने झुलता पूल, नेहरुनगर येथील बसवाण्णा-महादेव मंदिरात हलता देखावा करण्यात आला आहे. याबरोबरच माळी गल्ली येथे पर्यावरण संवर्धन, शिवाजीनगर येथे केदारनाथचा देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. त्याचबरोबर अनगोळ परिसरात गणेश दर्शनासाठी भाविकांची रिघ लागत आहे.
रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू
मध्यरात्री दोन ते तीन वाजेपर्यंत गणेश दर्शनासाठी रस्त्यांवर गर्दी असल्याने सर्वत्र खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू ठेवले जात आहेत. वडापाव, चहा, गोबी मंच्युरी, नुडल्स, स्प्रिंग रोल, भजी, स्वीटकॉर्न यासह इतर चटपटीत पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे. गणेशोत्सवामुळे लहान विक्रेत्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
हुल्लडबाजांविरोधात कारवाईची गरज...
शहरासह ग्रामीण भागातील भाविक देखावे पाहण्यासाठी शहरात येत आहेत. परंतु काही हुल्लडबाज तरुणांमुळे गणेशभक्तांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोठमोठ्यांनी भोंगे वाजविणे, ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर फटाके टाकणे, असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अशा हुल्लडबाज तरुणांवर पोलिसांनी वेळीच कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.