व्हॅक्सिन डेपोवर आज महामेळावा
अधिवेशनाला प्रत्युत्तर : मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे म. ए. समितीचे आवाहन
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमवार दि. 8 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. सकाळी 11 वाजता टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा होणार आहे. या महामेळाव्यावेळी मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहून कर्नाटक सरकारला एकी दाखवून द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. मागील काही वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा मराठी भाषिकांचा महामेळावा होणार असल्याने सीमावासीय सज्ज झाले आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. कर्नाटक सरकारकडून सीमाप्रश्नासंदर्भात टाळाटाळ केली जात असल्याने अखेर महाराष्ट्र सरकार 29 मार्च 2004 साली सर्वोच्च न्यायालयात गेले. सीमाभागातील 865 मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. असे असतानाही बेळगावमध्ये कानडीकरणाचा वरवंटा फिरविला जात आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कन्नडसक्ती केली जात असल्याने येथील मराठी माणसांवर अन्याय होत आहे.
कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन 2006 पासून बेळगावमध्ये भरविले जात आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महाअधिवेशन म्हणजेच महामेळावा भरविला जात आहे. यापूर्वी व्हॅक्सिन डेपो मैदान परिसरात महामेळावा होत होता. परंतु, मागील दोन चार वर्षांत पोलीस प्रशासन महामेळाव्यामध्ये आडकाठी घालत आहे. कोणत्याही परिस्थितीत सोमवारी व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा यशस्वी करणारच, असा निर्धार म. ए. समितीने केला आहे. महामेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून पुन्हा एकदा भगवे वादळ दाखवून द्यावे, असे आवाहन शहर म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, खानापूर म. ए. समिती, महिला आघाडी, युवा समिती, युवा आघाडी, युवा समिती सीमाभाग, शिवसेना यासह इतर संघटनांनी केले आहे.
महामेळावा यशस्वी करावा...
कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्यासाठी महामेळावा निश्चित करण्यात आला आहे. मराठी भाषिकांनी एकत्रित येत महामेळावा यशस्वी करावा आणि सीमाप्रश्नाच्या खटल्याला बळ द्यावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे,अॅड. एम. जी. पाटील यांच्यासह इतरांनी केले आहे.