बेळगावमध्ये 4 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : मंत्री एच. के. पाटील यांची माहिती
बेंगळूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून बेळगावमधील सुवर्णसौधमध्ये होणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली बेंगळुरात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी ही माहिती दिली. बेळगावमध्ये 4 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत 10 दिवस विधिमंडळ अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात विविध विधेयके मांडण्यात येतील. तसेच उत्तर कर्नाटकाच्या विकासासंबंधी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कृषीभाग्य योजना पुन्हा सुरू होणार
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना खूशखबर देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषीभाग्य योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. 2023-24 या वर्षात 24 जिल्ह्यांतील 106 तालुक्यांमध्ये 100 कोटी रुपये खर्च करून ही योजना जारी केली जाणार आहे. या योजनेंतर्गत शेततळे निर्माण करणे, लघु पाणीपुरवठा केंद्र, पाणी उपसा करण्यासाठी 5 एचपीपर्यंत डिझेल पंपसेट खरेदीसाठी साहाय्यधन, सुधारित पद्धतीने पिके घेण्याकरिता साहाय्य केले जाणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंजन योजना 5 तालुक्यांमध्ये जारी करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री एच. के. पाटील यांनी दिली.