8 डिसेंबरपासून बेळगावात हिवाळी अधिवेशन
सभापती बसवराज होरट्टी : तयारीविषयी पुढील आठवड्यात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
प्रतिनिधी/ बेंगळूर
उत्तर कर्नाटकातील दीर्घकालीन समस्यांवर चर्चा आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी 8 डिसेंबरपासून बेळगावमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी दिली. धारवाड येथे शनिवारी पत्रकारांशी ते बोलत होते. बेळगाव येथे होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी 8 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या तयारीसाठी पुढील आठवड्यात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल. अधिवेशन घेण्याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून संमती मिळविली आहे, असे ते म्हणाले.
दोन दिवसांत आमदारांना आदेशपत्रक पाठवेन. यंदा अधिवेशन काळात उत्तर कर्नाटकावरील चर्चेकडे दुर्लक्ष होणार नाही, याकडे जातीने लक्ष देईन. आमदारांना लेखी सूचना देऊन नंतर प्रसारमाध्यमांसाठी ते उघड करण्यात येईल. विधानपरिषद सदस्यांनाही लेखी स्वरुपात सूचना दिल्या जातील.
उत्तर कर्नाटकातील आमदार विकासाच्या बाबतीत गंभीर नाहीत
उत्तर कर्नाटकातील आमदार विकासकामांच्या बाबतीत गंभीर नाहीत. केवळ दक्षिण कर्नाटकातील आमदारच विकासकामांच्या मुद्द्यावर भाष्य करतात. दर बुधवारी, गुरुवारी उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी दिवस राखून ठेवण्यात आला आहे. परंतु, कोणताही आमदार उत्तर कर्नाटकातील समस्यांवर बोलण्यासाठी उत्सुक नाही, अशी खंत सभापती होरट्टी यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री बदलाविषयी प्रतिक्रिया देताना सभापती बसवराज होरट्टी यांनी, नोव्हेंबर क्रांती किंवा डिसेंबर क्रांती होऊ दे. क्रांती करणारे, करून घेणारेही आहेत. उघड्या डोळ्यांनी त्याकडे पाहणे हे आमचे काम आहे. या घडामोडी योग्य वाटत नाहीत. दररोज प्रसारमाध्यमांसमोर ज्वलंत समस्यांवर चर्चा करण्याचे सोडून केवळ वैयक्तिक चर्चाच रंगली आहे. कोणीही निरर्थक चर्चा करू नयेत. राज्यातील जनतेसाठी करण्यासारखी अनेक कामे आहेत. त्याविषयी बोलावे. सभापती म्हणून हे सांगणे माझे कर्तव्य आहे, असे सांगितले.