For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिवाळी अधिवेशन 9 डिसेंबरपासून

10:24 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिवाळी अधिवेशन 9 डिसेंबरपासून
Advertisement

सभाध्यक्ष, सभापतींनी घेतला बेळगावातील तयारीचा आढावा

Advertisement

बेळगाव : कर्नाटक विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 9 ते 20 डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर व विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी सुवर्णविधानसौधमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. अधिवेशनाच्या काळात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये यासाठी दक्षता घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. सध्या दि. 9 ते 20 डिसेंबरपर्यंत अधिवेशन ठरविण्यात आले आहे. तारखेसंबंधीचा अंतिम निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत होणार आहे. गेल्यावर्षी निटनेटकेपणाने अधिवेशनाच्या काळात सर्व व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही प्रशासनाने आवश्यक तयारी करण्याची सूचना विधानसभाध्यक्ष यु. टी. खादर फरीद यांनी अधिकाऱ्यांना केली. शुक्रवारी सुवर्णविधानसौधमध्ये झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सभाध्यक्ष पुढे म्हणाले, अधिवेशनासाठी येणारे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, अधिकारी यांची गैरसोय होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. लोकप्रतिनिधींबरोबरच सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी, वाहन चालक, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवास व भोजन व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली.

सुवर्णविधानसौधच्या प्रवेशद्वारावर गर्दी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. आंदोलनाची ठिकाणे व इतर प्रमुख ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. विधीमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. सुवर्णविधानसौधला येणाऱ्या शाळकरी मुलांची माहिती आधी द्यावी, विद्यार्थ्यांसाठी सावलीची व्यवस्था करावी, सुवर्णविधानसौधमध्ये स्वच्छता राखण्यावर भर द्यावा, अशी सूचना यु. टी. खादर यांनी केली. यावेळी बोलताना विधानपरिषदचे सभापती बसवराज होरट्टी म्हणाले, गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही वेगवेगळ्या जिल्ह्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, शेजारच्या जिल्ह्यातील कलाकारांना प्राधान्य द्यावे, मंत्री, आमदारांची ज्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था असते तेथे नागरिकांच्या भेटीसाठीही विशेष व्यवस्था करावी, हॉटेल मालकांशी चर्चा करून त्यांना आवश्यक सूचना करावी.

Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिवेशन सुरळीतपणे पार पडावे यासाठी निवास, भोजन, सुरक्षा विषयक समित्या स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. मुख्यमंत्री, मंत्री, अधिकाऱ्यांच्या वाहन चालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. सुवर्णविधानसौध परिसरात मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र भोजनाची व्यवस्था असणार आहे. याबरोबरच चार खासगी कॅन्टीन सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी अधिवेशन बंदोबस्ताची माहिती दिली. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, विधानसभेच्या सचिव एम. के. विशालाक्षी, विधानपरिषदेच्या सचिव महालक्ष्मी, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना यांच्यासह विविध खात्यातील अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.