दक्षिण आफ्रिका जिंकता जिंकता हरली
विंडीजने शेवटच्या 36 चेंडूत सामना फिरवला : दुसऱ्या टी-20 सामनाही विंडीजने जिंकला
वृत्तसंस्था/ त्रिनिदाद अँड टोबॅगो
एके काळी जिंकेल असे वाटत असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटच्या पाच -सहा षटकांत इतका घसरला की सामना त्यांनी गमावला. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 36 चेंडूत 50 धावा हव्या होत्या आणि सहा विकेट शिल्लक होत्या. 4 बाद 129 अशा भक्कम स्थितीत असलेल्या आफ्रिकेने अवघ्या 20 धावांत 6 विकेट गमावल्या आणि आफ्रिकन संघ 149 धावांत ऑलआऊट झाला. यजमान विंडीजने दुसरा टी-20 सामना 30 धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. सामनावीर रोमारिओ शेफर्ड व शमार जोसेफ यांनी प्रत्येकी तीन बळी घेत विंडीजच्या विजयात मोलाचे योगदान दिले. उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 28 रोजी होईल.
ब्रायन लारा स्टेडियमवर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या वेस्ट इंडिजने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 179 धावा केल्या. सलामीवीर अॅथनेझ (21 चेंडूत 28) आणि शाय होपने पहिल्या विकेटसाठी 34 चेंडूत 41 धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करुन दिली. होपने 22 चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 41 धावांची जलद खेळी केली. नवव्या षटकात पॅट्रिक क्रुगरचा बळी ठरल्याने होप मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक झळकावू शकला नाही. अनुभवी रोस्टन चेस (7 धावा) आणि निकोलस पूरन (19) हे दोघे अपयशी ठरले. पण कर्णधार रोव्हमन पॉवेल (22 चेंडूत 35) आणि शेरफेन रुदरफोर्ड (18 चेंडूत 29) यांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे वेस्ट इंडिजने 179 धावापर्यंत मजल मारली.
आफ्रिकेच्या पदरी पुन्हा निराशा
लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली. रीझा हेंड्रिक्सने (18 चेंडूत 44) वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला. त्याने रायन रिकेल्टन (13 चेंडूत 20) सोबत पहिल्या विकेटसाठी 28 चेंडूत 63 धावा जोडल्या. शमार जोसेफने पाचव्या षटकात रिकेल्टनला बाद करून ही भागीदारी मोडली. पुढच्याच षटकात रोमारियो शेफर्डने हेंड्रिक्सला बाद करत विंडीजला मोठे यश मिळवून दिले. कर्णधार मार्करम (19 धावा) व ट्रिस्टन स्टब्जने (28) धावा केल्या. यावेळी आफ्रिकेची 4 बाद 134 अशी स्थिती होती. स्टब्ज बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी मात्र सपशेल लोटांगण घातल्याने आफ्रिकेचा डाव 19.4 षटकांत 149 धावांवर आटोपला. रोमारिओ शेफर्डने 15 धावांत 3 तर शमार जोसेफने 31 धावांत 3 बळी घेत आफ्रिकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. या दोघांनी मिळून मालिकेत बरोबरी साधण्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या आशा धुळीस मिळवल्या.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज 20 षटकांत 6 बाद 179 (अॅथनेझ 28, शाय होप 41, रोव्हमन पॉवेल 35, रुदरफोर्ड 29, लिजा विल्यम्स 3 तर पॅट्रिक व्रुगर 2 बळी)
दक्षिण आफ्रिका 19.4 षटकांत सर्वबाद 149 (रिकेल्टन 20, रिझा हेंड्रिक्स 44, स्टब्ज 28, शेफर्ड व जोसेफ प्रत्येकी 3 बळी).