For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सराव सामन्यात विंडीज 35 धावांनी विजयी

06:24 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
सराव सामन्यात  विंडीज 35 धावांनी विजयी
Advertisement

विंडीजने उडवला कांगारुंचा धुव्वा : निकोल्स पूरनचे अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक

Advertisement

वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन

सामनावीर निकोल्स पूरन (25 चेंडूत 75), कर्णधार रोव्हमन पॉवेल (25 चेंडूत 52), रुदरफोर्ड (नाबाद 47) यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 35 धावांनी पराभव केला. पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या लढतीत दोन्ही संघाकडून धावांची बरसात झाली. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 257 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 7 बाद 222 धावापर्यंत मजल मारता आली. विशेष म्हणजे, टी 20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सहभागी संघ सराव सामने खेळत आहेत. अमेरिका-वेस्ट इंडिजमधील वातावरणाचा अंदाज घेत आहेत. मात्र या सराव सामन्यात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांनी आपली ताकद दाखवली आहे. यामुळे या संघांना हलक्यात घेणं चांगलंच महागात पडू शकतं, हे विंडीजसारख्या संघांनी दाखवून दिले आहे.

Advertisement

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांना चांगलाच महागात पडला. सलामीवीर शाय होप व जॉन्सन चार्ल्स यांनी 3 षटकांत 38 धावांची सलामी दिली. होपला 14 धावांवर अॅगरने बाद करत विंडीजला पहिला धक्का दिला. यानंतर चार्ल्स व निकोल्स पूरन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना 90 धावांची भागीदारी साकारली. पुरनने पहिल्या 4 चेंडूत सलग 3 षटकार आणि एक चौकार लगावला. त्याने अवघ्या 16 चेंडूत आपले धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले. यानंतरही त्याचे आक्रमण सुरूच राहिले आणि अखेर 300 च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 25 चेंडूत 75 धावा करून तो बाद झाला. पुरनने आपल्या खेळीत 8 षटकार आणि 5 चौकार लगावले. चार्ल्सने 6 चौकारासह 40 धावा करत त्याला चांगली साथ दिली. पूरन-चार्ल्सनंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार रोव्हमन पॉवलेनही कांगारुंची धुलाई केली. त्याने 25 चेंडूत 52 धावांची शानदार खेळी साकारली तर रुदरफोर्डनेही अवघ्या 18 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारासह नाबाद 47 धावा ठोकल्या. हेटमेयर 18 धावांवर नाबाद राहिला. या जोरावर विंडीजने 20 षटकांत 4 बाद 257 धावांचा डोंगर उभा केला.

ऑस्ट्रेलिया 35 धावांनी पराभूत

वेस्ट इंडिजप्रमाणे ऑस्ट्रेलियानेही दमदार सुरुवात केली. फिरकीपटू अॅश्टन अॅगरला सलामीला पाठवत ऑस्ट्रेलिया संघाने आश्चर्याचा धक्का दिला. अॅगरनेही 13 चेंडूत 28 धावा करत हा निर्णय योग्य सिद्ध केला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (15) व कर्णधार मिचेल मार्श (4) हे स्टार फलंदाज मात्र स्वस्तात बाद झाले. यानंतर जोश इंग्लिस आणि टीम डेव्हिड यांनी चौथ्या विकेटसाठी 53 धावा जोडल्या. ही भागीदारी 10 व्या षटकात टीम डेव्हिडच्या विकेटसह संपुष्टात आली. टीम डेव्हिडने 12 चेंडूत 25 धावा केल्या. यानंतर 13व्या षटकात मॅथ्यू वेड बाद झाला. वेडने 25 धावांचे योगदान दिले. इंग्लिसने अर्धशतकी खेळी साकारताना 30 चेंडूत 55 धावा केल्या. नॅथन एलिसने फटकेबाजी करताना 22 चेंडूत 39 तर अॅडम झम्पाने 16 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. ऑसी संघाला 20 षटकांत 7 बाद 222 धावापर्यंत मजल मारता आली. त्यांनी हा सामना 35 धावांनी गमावला. विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजचा संघ या सराव सामन्यात पूर्ण ताकदीनिशी उतरला होता. तर ऑस्ट्रेलिया संघाने पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांना विश्रांती दिली होती.

संक्षिप्त धावफलक

विंडीज 20 षटकांत 4 बाद 257 (जॉन्सन चार्ल्स 40, निकोल्स पूरन 75, रोव्हमन पॉवेल 52, हेटमेयर नाबाद 18, रुदरफोर्ड नाबाद 47, अॅडम झम्पा 2 तर टीम डेव्हिड व अॅगर प्रत्येकी एक बळी).

ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 7 बाद 222 (अॅगर 28, जोस इंग्लिस 55, नॅथन एलिस 39, झम्पा नाबाद 21, अल्झारी जोसेफ व गुडकेश मोटी प्रत्येकी दोन बळी).

Advertisement
Tags :

.