पहिल्या वनडेत विंडीजचा 4 गड्यांनी विजय
इंग्लिश गोलंदाजांची तुफानी धुलाई : सामनावीर शाय होपचे नाबाद शतक
वृत्तसंस्था/ अँटिग्वा
अँटिग्वा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 7 चेंडू व 4 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजसमोर 326 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान वेस्ट इंडिजने 48.5 षटकात 6 विकेट्स गमावत पूर्ण केले. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप विजयाचा हिरो ठरला. त्याने शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजसाठी मायदेशात धावांचा पाठलाग करताना हा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी विंडीजने मायदेशात 326 धावांचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. उभय संघातील दुसरा सामना दि. 6 रोजी खेळवण्यात येणार आहे.
प्रारंभी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फिल सॉल्ट व विल जॅक्स यांनी 77 धावांची सलामी दिली. सॉल्टने 45 तर जॅक्सने 26 धावा केल्या. ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर झॅक क्रॉलीने 48 धावांचे योगदान दिले तर बेन डकेट फारसा यशस्वी ठरला नाही. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या हॅरी ब्रुकने सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. 72 चेंडूचा सामना करताना त्याने 7 चौकार व 2 षटकार लगावले. यानंतर तळाचा फलंदाज सॅम करन 36 चेंडूत 38 व ब्रायडन कार्स 21 चेंडूत नाबाद 31 यांनी शानदार खेळी साकारत संघाला तीनशेचा टप्पा गाठून दिला. याचबरोबर रेहान अहमदने 12 तर अॅटिन्सनने 4 धावा केल्या. अॅटिन्सन बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव 325 धावांवर संपुष्टात आला.
शाय होपचे शानदार शतक
326 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर अॅलेक अॅथनेज आणि ब्रेंडॉन किंग या जोडीने पहिल्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. अॅथनेज 65 चेंडूत 66 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ब्रेंडॉन किंग 44 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार शाय होपला केसी कार्टी (16), शिमरॉन हेटमायर (32) आणि रोमारियो शेफर्ड (48) यांनीही चांगली साथ देत विंडीजच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कर्णधार शाय होपने 83 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 109 धावांची नाबाद खेळी साकारली तर रोमारियो शेफर्डने 28 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह 48 धावा फटकावल्या. यामुळे विंडीजने विजयी लक्ष्य 48.5 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड 50 षटकांत सर्वबाद 325 (फिल सॉल्ट 45, झॅक क्रॉली 48, हॅरी ब्रुक 71, सॅम करन 38, रोमारियो शेफर्ड, ओशेन थॉमस व गुडाकेश मोती प्रत्येकी दोन बळी)
वेस्ट इंडिज 48.5 षटकांत 6 बाद 326 (अॅथनेज 66, ब्रेंडॉन किंग 35, शाय होप नाबाद 109, रोमारियो शेफर्ड 48, अॅटकिन्सन, रेहान अहमद प्रत्येकी दोन बळी) .
धोनीने दिलेला सल्ला असा कामी आला, होपने असा पलटला सामना
अँटिग्वा येथे इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यात पहिला वनडे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान विंडीजने इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला. दरम्यान, विंडीजच्या विजयात कर्णधार शाय होपचा मोलाचा वाटा होता. त्याने 83 चेंडूत 4 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने नाबाद 109 धावांची खेळी साकारली. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. विजयानंतर शाई होपने धोनीचे आभार मानले. काही वेळापूर्वी मी एमएस धोनीशी गप्पा मारल्या होत्या आणि तेव्हा त्याने मला सांगितले की क्रीझवर असताना आपण विचार करतो त्यापेक्षाही बराच वेळ आपल्याकडे असतो. ही गोष्ट माझ्या डोक्यात घर करून राहिली होती. आम्ही मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे, पुढील सामन्यातही त्याची पुनरावृत्ती करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे शाय होप म्हणाला.