विंडीजचा बांगलादेशवर एकतर्फी मालिका विजय
रुदरफोर्ड ‘मालिकावीर’, ‘सामनावीर’अमिर जंगूचे नाबाद शतक
वृत्तसंस्था / बॅसेट्री
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान विंडीजने बांगलादेशचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील झालेल्या शेवटच्या सामन्यात विंडीजने बांगलादेशवर 25 चेंडू बाकी ठेवून 4 गड्यांनी विजय मिळविला. विंडीजच्या रुदरफोर्डने ‘मालिकावीर’ तर अमिर जंगूने ‘सामनावीरा’चा बहुमान मिळविला.
या शेवटच्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशने 50 षटकात 5 बाद 321 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 45.5 षटकात 6 बाद 325 धावा जमवित हा सामना आणि मालिका एकतर्फी जिंकली.
बांगलादेशच्या डावात 4 फलंदाजांनी अर्धशतके झळकविली. सौम्या सरकारने 73 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 73, कर्णधार मेहदीहसन मिराजने 73 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 77, मेहमुदुल्लाने 63 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 84 तर जाकेर अलीने 57 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 62 धावा झळकविल्या. मेहमुदुल्ला आणि जाकरअली यांनी सहाव्या गड्यासाठी अभेद्य 150 धावांची भागिदारी केली. सरकार कर्णधार मेहदी हसन मिराज यांनी तिसऱ्या गड्यासाठी 136 धावांची शतकी भागिदारी नोंदविली. या दोन भागिदाऱ्यांमुळे बांगलादेशला 321 धावांपर्यंत मजल मारता आली. बांगलादेशच्या डावात 12 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे अल्झारी जोसेफने 43 धावांत 2 तर मोती आणि रुदरफोर्डने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना नवोदित फलंदाज अमिर जंगूचे नाबाद शतक तसेच कार्टीच्या समयोचित 95 धावांच्या खेळीच्या जोरावर विंडीजने 25 चेंडू बाकी ठेवून विजय मिळविला. जंगूने 83 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 104 तर कार्टीने 88 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह 95, मोतीने 31 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 44 धावा जमाविल्या. जंगू आणि मोती यांनी सातव्या गड्यासाठी यांनी अभेद्य 91 धावांची भागिदारी करत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. विंडीजच्या डावात 10 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे रिशाद हुसेनने 69 धावांत 2 तर हसन मेहमुद, नेसुम अहमद, तस्कीन अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धाकफलक : बांगलादेश 50 षटकात 5 बाद 321 (मेहमुदुल्ला नाबाद 84, जाकेर अली नाबाद 62, सौम्य सरकार 73, मेहदीहसन मिराज 77, अफिफ हुसेन 15 अवांतर 10, अल्झारी जोसेफ 2-43, मोती 1-64, रुदरफोर्ड 1-37), विंडीज 45,5 षटकात 6 बाद 325 (अमिर जंगू नाबाद 104, कार्टी 95, किंग 15, रुदरफोर्ड 30, चेस 12, मोती नाबाद 44, अवांतर 15, रिशाद हुसेन 2-69, हसन मेहमुद, नेसुम अहमद, तस्किन अहमद प्रत्येकी 1 बळी)