पिंक बॉल टेस्टमध्येही इंग्लंडची शरणागती
ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय : विजयासह मालिकेत 2-0 ने आघाडी : मिचेल स्टार्क सामनावीर
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
अॅशेस मालिकेतील पिंक बॉल टेस्टमध्येही वर्चस्व कायम राखत ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना 8 विकेट्सनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी दमदार आघाडी घेतली आहे. 8 विकेट्स आणि 77 धावा करणारा मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
पहिल्या टेस्टमध्ये शरणागती पत्करल्यानंतर इंग्लंड संघावर जोरदार टीका झाली होती. त्या पराभवातून बोध घेत इंग्लंड खेळ सुधारेल असे वाटले होते पण पिंक बॉल टेस्टमध्येही इंग्लंडने सर्वसाधारण खेळ केला. या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपले अव्वलस्थान आणखी मजबूत केले आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या सत्रात ऑसी संघाने एकही पराभव स्वीकारलेला नाही.
सामन्यात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
प्रारंभी, टॉस जिंकून इंग्लंडने बॅटिंगचा निर्णय घेतला. जो रूटच्या शतकाच्या बळावर इंग्लंडने 334 धावांची मजल मारली. रूटने 12 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पहिलेवहिले शतक झळकावलं. जॅक क्रॉलीने 76 धावा करत त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्कने 6 विकेट्स पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने 511 धावांचा डोंगर उभारला. जेक वेदराल्ड, मार्नस लबूशेन, स्टीव्हन स्मिथ, अलेक्स कॅरे, मिचेल स्टार्क यांनी अर्धशतकी खेळी केल्या. इंग्लंडतर्फे ब्रायडन कार्सने 4 तर बेन स्टोक्सने 3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने 177 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली.
इंग्लिश फलंदाजांची निराशा
दुसऱ्या डावातही इंग्लंडची घसरगुंडी सुरूच राहिली. द गाबा स्टेडियममध्ये रविवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने 6 बाद 134 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. बेन स्टोक्सने सर्वाधिक 50 धावा केले तर विल जॅक्स 41 धावांवर बाद झाला. तळातल्या फलंदाजांनीही निराशा केल्याने इंग्लिश संघ 241 धावांत ऑलआऊट झाला आणि ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी अवघे 65 धावांचे लक्ष्य मिळाले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात मायकेल नीसरने 5 बळी घेतले. स्टार्क आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी 2 बळी घेतले.
विजयासाठी मिळालेले लक्ष्य ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात गाठले आणि चौथ्या दिवशीच विजयावर शिक्कामोर्तब केले. ट्रॅव्हिस हेडने 22 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 22 धावा केल्या. लाबुशेन 3 धावा करत माघारी परतला. यानंतर वेदराल्डने नाबाद 17 तर कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाबाद 23 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. स्मिथने आपल्या छोटेखानी खेळीत 2 चौकार आणि 2 षटकार खेचले. कांगारुंनी विजयी टार्गेट 10 षटकांत पूर्ण करत मालिकेत सलग दुसरा विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव 334 आणि दुसरा डाव 241 (स्टोक्स 50, विल जॅक्स 41, नीसर 5-42, स्टार्क 2-64).
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 511 आणि दुसरा डाव 10 षटकांत 2 बाद 69 (हेड 22, वेदराल्ड नाबाद 17, लाबुशेन 3, स्मिथ नाबाद 23, अॅटकिन्सन 2 बळी).
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत कांगारुंच अव्वल
ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत आतापर्यंत अजिंक्य आहे. ऑस्ट्रेलियाने या साखळीत 5 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 60 पॉइंट्स आहेत. तर ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 100 टक्के इतकी आहे. दुसरीकडे, इंग्लिश संघाला पराभवामुळे मात्र चांगलाच दणका बसला आहे. सध्याच्या घडीला, इंग्लंडचा संघ सातव्या स्थानावर आहे. याशिवाय, दक्षिण आफ्रिकन संघ दुसऱ्या, श्रीलंका तिसऱ्या, पाकिस्तान चौथ्या तर भारत पाचव्या स्थानी आहे.