For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विंडीजचा अफगाणवर 104 धावांनी विजय

06:58 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
विंडीजचा अफगाणवर 104 धावांनी विजय
Advertisement

निकोलस पूरनची स्फोटक खेळी, प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना

Advertisement

वृत्तसंस्था/ ग्रोस आयलेट (सेंट लुसिया)

2024 च्या आयसीसी विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील क गटातील मंगळवारी झालेल्या सामन्यात ‘सामनावीर’ निकोलस पूरनच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर विंडीजने अफगाणचा 104 धावांनी दणदणीत पराभव केला. या स्पर्धेत क गटातून विंडीज आणि अफगाण यांनी सुपरएटमध्ये प्रवेश केला आहे. पूरनने 53 चेंडूत 8 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 98 धावा झोडपल्या. या स्पर्धेत प्राथमिक फेरीतील हा 40 वा आणि शेवटचा सामना होता.

Advertisement

मंगळवारच्या सामन्यात अफगाणने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकात 5 बाद 218 धावा जमविल्या. त्यानंतर अफगाणचा डाव 16.2 षटकात 114 धावांत आटोपला. हा सामना सुरु होण्यापूर्वी विंडीज आणि अफगाण यांनी सुपरएट फेरीतील आपले स्थान निश्चित केल्याने दोन्ही संघांवर विशेष दडपण नव्हते. यजमान विंडीजची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

ब्रेंडन किंग आणि जॉन्सन चार्लस यांनी विंडीजच्या डावाला आक्रमक सुरुवात केली. या जोडीने केवळ 11 चेंडूत 22 धावा जमविल्या. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अफगाणच्या ओमरझाईने किंगचा 7 धावांवर त्रिफळा उडविला.  नंतर चार्लस आणि पूरन यांनी तुफान फटकेबाजी करताना दुसऱ्या गड्यासाठी 6.1 षटकात 80 धावांची भागिदारी केली. चार्लसने 27 चेंडूत 8 चौकारांसह 43 धावा जमविल्या. आठव्या षटकातील शेटवच्या चेंडूवर चार्ल्स नवीन उल हकच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पूरनला होपकडून बऱ्यापैकी साथ मिळाली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 33 धावांची भर घातली. नईबने होपला झेलबाद केले. त्याने 17 चेंडूत 2 षटकारांसह 25 धावा जमविल्या. कर्णधार पॉवेल आणि पूरन यांच्या फटकेबाजीमुळे विंडीजला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 38 चेंडूत 64 धावांची भागिदारी केली. नईबने पॉवेलला 19 व्या षटकात झेलबाद केले. पॉवेलने 15 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 26 धावा जमविल्या. निकोलस पूरन आपले शतक पूर्ण करेल असे वाटत असताना तो शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर धावचीत झाला. रसेल 3 धावांवर तर रुदरफोर्ड एका धावेवर नाबाद राहिले.

डावातील चौथ्या षटकात पूरनने 36 धावा झोडपल्या. ओमरझाईच्या या षटकात पूरनने पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर नोबॉलसह 5 धावा, तिसऱ्या चेंडूवर वाईडसह 5 धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. त्याला पाचव्या चेंडूवर 4 धावा लेगबाईज मिळाल्या. सहाव्या चेंडूवर त्याने चौकार, सातव्या चेंडूवर षटकार आणि आठव्या चेंडूवर षटकार खेचला. ओमरझाईचे हे षटक 8 चेंडूंचे राहिले. पूरनने डावातील 18 व्या षटकात 24 धावा घेतल्या. कर्णधार रशिदच्या या षटकामध्ये त्याने 3 उत्तुंग षटकार व 1 चौकार मारला. निकोलस पूरनने आपल्याच देशाच्या ख्रिस गेलचा टी-20 प्रकारातील 124 षटकारांचा विक्रम मागे टाकला.

विंडीजच्या डावात 15 अवांतर धावा मिळाल्या. विंडीजने पॉवरप्लेच्या 6 षटकात 92 धावा जमविताना एक गडी गमविला. विंडीजचे अर्धशतक 21 चेंडूत, शतक 48 चेंडूत, दीडशतक 93 चेंडूत तर द्विशतक 115 चेंडूत फलकावर लागले. चार्लस आणि पूरन यांनी अर्धशतकी भागिदारी केवळ 14 चेंडूत नोंदविले. पूरनने 31 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. पूरन आणि पॉवेल यांनी अर्धशतकी भागिदारी 31 चेंडूत केली. विंडीजच्या डावात 12 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे नईबने 2 तर ओमरझाई, नवीन उल हक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर अफगाणचा डाव 16.2 षटकात 114 धावांत आटोपला. त्यांच्या 4 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. इब्राहिम झद्रनने 28 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 38, ओमरझाईने 19 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 23, जनतने 9 चेंडूत 1 षटकारासह 14 तर कर्णधार रशिद खानने 11 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18 धावा जमविल्या. विंडीजतर्फे ओबेद मकॉयने 14 धावांत 3, अकिल हुसेन व मोती यांनी प्रत्येकी 2, रसेल आणि जोसेफ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. अफगाणने पॉवरप्लेच्या 6 षटकात 45 धावा जमविताना 1 गडी गमविला. अफगाणचे अर्धशतक 41 चेंडूत तर शतक 86 चेंडूत नोंदविले गेले. अफगाणने 10 षटकात 5 बाद 66 धावा जमविल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक - विंडीज 20 षटकात 5 बाद 218 (पूरन 53 चेंडूत 8 षटकार आणि 6 चौकारांसह 98, चार्लस 27 चेंडूत 8 चौकारांसह 43, होप 2 षटकारांसह 25, पॉवेल 2 षटकार आणि 1 चौकारासह 26, अवांतर 15, नईब 2-14, ओमरझाई 1-41, नवीन उल हक 1-41), अफगाण 16.2 षटकात सर्व बाद 114, झद्रन 38, ओमरझाई 23, जनत 14, रशिद खान 18, अवांतर 7, मकॉय 3-14, मोती 2-28, अकिल हुसेन 2-21, रसेल 1-17, जोसेफ 1-30).

Advertisement
Tags :

.