कसोटी मालिकेत विंडीजचा ‘व्हाईटवॉश’
वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान इंग्लंडने विंडीजचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील येथे रविवारी झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडने खेळाच्या तिसऱ्या दिवशी विंडीजचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव केला. स्टोक्सने इंग्लंडतर्फे सर्वात वेगवान कसोटी अर्धशतक नोंदवले. त्याने 24 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
या शेवटच्या कसोटीत विंडीजने पहिल्या डावात 282 धावा जमविल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 376 धावा जमवित 94 धावांची आघाडी मिळवली होती. त्यानंतर विंडीजने 2 बाद 33 या धावसंख्येवरुन रविवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा दुसरा डाव 52 षटकात 175 धावांत आटोपला. विंडीज संघातील लुईस आणि हॉज यांनी अर्धशतके झळकाविली. लुईसने 2 षटकार आणि 4 चौकारांसह 57 तर हॉजने 7 चौकारांसह 55 धावा जमविल्या. होल्डरने 2 चौकारांसह 12 धावा केल्या. विंडीजच्या केवळ 4 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. इंग्लंडचा मार्क वूड सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 40 धावांत 5 गडी बाद केले. अॅटकिनसनने 28 धावांत 2 तर वोक्स, बशिर आणि स्टोक्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 82 धावांची गरज होती. कर्णधार स्टोक्स आणि डकेट या सलामीच्या जोडीने 7.2 षटकात बिनबाद 85 धावा जमवित हा सामना चहापानापूर्वीच जिंकला. स्टोक्सने 28 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 55 तर डकेटने 16 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 25 धावा झळकाविल्या.
संक्षिप्त धावफलक - विंडीज प. डाव 75.1 षटकात सर्वबाद 282, इंग्लंड प. डाव 75.4 षटकात सर्वबाद 376, विंडीज दु. डाव 52 षटकात सर्वबाद 175 (लुईस 57, हॉज 55, होल्डर 12, वूड 5-40, अॅटकिनसन 2-28, वोक्स, बशीर, स्टोक्स प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड दु. डाव 7.2 षटकात बिनबाद 85 (स्टोक्स नाबाद 55, डकेट नाबाद 25).