विंडीजची वनडे मालिकेत विजयी आघाडी
बांगलादेशचा 7 गड्यांनी पराभव, जायडेन सेल्स ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / बॅसेट्री
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विंडीजने बांगलादेशवर 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात विंडीजने बांगलादेशचा 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला. 22 धावांत 4 गडी बाद करणाऱ्या जायडेन सेल्सला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशचा डाव 45.5 षटकात 227 धावांत आटोपला. त्यानंतर विंडीजने 36.5 षटकात 3 बाद 230 धावा जमवित विजय नोंदविला.
बांगलादेशच्या डावात मेहमुद्दुल्लाने 92 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 62, सलामीच्या टी. हसनने 33 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 46, अफिफ हुसेनने 29 चेंडूत 4 चौकारांसह 24, शकीबने 62 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 45 तर एस. इस्लामने 8 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. विंडीजच्या अचूक गोलंदाजीसमोर बांगलादेशचे 7 फलंदाज केवळ 115 धावांत तंबूत परतले होते. त्यानंतर शकीब आणि मेहमुद्दूल्ला यांनी आठव्या गड्यासाठी 92 धावांची भागिदारी केली. बांगलादेशच्या डावात 9 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे सेल्सने 22 धावांत 4 तर मोतीने 36 धावांत 2 तसेच मिंडले, शेफर्ड, ग्रिव्हेस आणि चेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात सलामीच्या ब्रेनडॉन किंगने लेव्हीस समवेत सलामीच्या गड्यासाठी 109 धावांची भागिदारी केली. लेव्हीसने 62 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 49 धावा झळकविल्या. लेव्हीस बाद झाल्यानंतर किंग आणि कार्टी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 66 धावांची भर घातली. किंगने 76 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 82 धावा जमविल्या. कार्टीने 47 चेंडूत 7 चौकारांसह 45 धावा केल्या. कर्णधार शाय हॉप आणि रुदरफोर्ड यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. हॉप 1 षटकार आणि 1 चौकारासह 17 धावांवर तर रुदर फोर्ड 2 षटकार आणि 1 चौकारासह 24 धावांवर नाबाद राहिला. विंडीजच्या डावात 10 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश 45.5 षटकात सर्वबाद 227 (मेहमुद्दूल्ला 62, टी. हसन 46, शकीब 45, अफीफ हुसेन 24, एस. इस्लाम 15, अवांतर 21, सेल्स 4-22, मोती 2-36, मिंडले, शेफर्ड, ग्रिव्हेस, चेस प्रत्येकी 1 बळी), विंडीज 36.5 षटकात 3 बाद 230 (किंग 82, लेव्हीस 49, कार्टी 45, हॉप नाबाद 17, रुदरफोर्ड नाबाद 24, अवांतर 13, नाहीद राणा, रिशाद हुसेन आणि आफीफ हुसेन प्रत्येकी 1 बळी)