नेपाळ संघाकडून विंडीजला पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था/ शारजा
नेपाळच्या क्रिकेट संघाने येथे झालेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात बलाढ्या आणि आतापर्यंत दोन वेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या विंडीजला 19 धावांनी पराभूत करत क्रिकेटच्या इतिहासात आयसीसीच्या पूर्ण सदस्यत्व असलेल्या संघावर पहिला विजय मिळविला आहे.
2014 साली नेपाळने अफगाणला पराभवाचा धक्का दिला होता. शनिवारी झालेल्या या सामन्यातील निकालाने नेपाळचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय म्हणावा लागेल. नेपाळ आणि विंडीज यांच्यात पहिलीच द्विपक्षीय टी-20 मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून नेपाळला प्रथम फलंदाजी दिली. नेपाळने 20 षटकात 8 बाद 148 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 20 षटकात 9 बाद 129 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 19 धावांनी गमवावा लागला. विंडीजच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत नेपाळला चौथ्या षटकात 2 बाद 12 धावांपर्यंत रोखले होते. अकिल हुसेन आणि जेसन होल्डर यांनी नेपाळचे हे पहिले दोन गडी बाद केले. त्यानंतर नेपाळचा कर्णधार रोहित पॉडेल आणि कुशल मल्ला यांनी 58 धावांची भागिदारी केली. कर्णधार पॉडेलने 38 तर मल्लाने 30 धावा जमविल्या. मल्लाने आपल्या खेळीमध्ये 2 षटकार ठोकले. विंडीजतर्फे टी-20 प्रकारात पदार्पण करणाऱ्या नवीन बिडेसीने नेपाळच्या पॉडेल आणि मल्ला यांना बाद केले. दरम्यान दिपेंद्रसिंग आयरीने 24 धावांत तसेच गुलशन झा ने दिपेंद्रसिंगला चांगली साथ देत धावफलक हालता ठेवला. विंडीजच्या होल्डरने नेपाळच्या डावातील 19 व्या षटकात 3 गडी बाद केले. त्यामुळे नेपाळने 20 षटकात 8 बाद 148 धावांपर्यंत मजल मारली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचा वरच्या फळीतील फलंदाज कायली मेयर्स भूरतेलच्या अचूक फेकीवर धावचीत झाला. त्यानंतर विंडीजतर्फे टी-20 प्रकारात पदार्पण करणाऱ्या अकिम ऑगेस्टीने 2 षटकारांसह 15 धावा जमविल्या. त्यानंतर नेपाळच्या फिरकी गोलंदाजांनी विंडीजच्या फलंदाजांना चांगलेच रोखले. भूरतेलने होल्डरला 5 धावांवर बाद केले. नेपाळच्या करणने हुसेनला 19 व्या षटकात बाद करुन विंडीजला 9 बाद 129 धावांवर रोखले.
संक्षिप्त धावफलक : नेपाळ 20 षटकात 8 बाद 148, विंडीज 20 षटकात 9 बाद 129.