विंडीजने कांगारुना रोखले 286 धावांवर
दुसरी कसोटी, वेबस्टर, कॅरे यांची अर्धशतके, जोसेफचे 4 बळी
वृत्तसंस्था / सेंट जॉर्ज
यजमान विंडीजने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर येथे सुरू झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 286 धावांवर रोखले. तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकून आघाडी मिळविली आहे. या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियातर्फे वेबस्टर आणि कॅरे यांनी अर्धशतके झळकविली तर विंडीजच्या अल्झारी जोसेफने 4 तर सेल्सने 2 गडी बाद केले.
या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर विंडीजच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघा 110 धावांत गुंडाळला. त्यानंतर कॅरे आणि वेबस्टर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 112 धावांची शतकी भागिदारी केल्याने कांगारुना 286 धावांपर्यंत मजल मारता आली.
कोनस्टास आणि उस्मान ख्वॉजा यांनी डावाला सावध सुरुवात करताना सलामीच्या गड्यासाठी 47 धावांची भागिदारी केली. विंडीजच्या अल्झारी जोसेफने ही जोडी फोडताना ख्वॉजाला पायचित केले. त्याने 2 चौकारासह 16 धावा जमविल्या. फिलीपने ऑस्ट्रेलियाच्या कोनस्टासला हॉपकरवी झेलबाद केले. त्याने 4 चौकारांसह 25 धावा जमविल्या. जोसेफने ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का देताना स्टिव्ह स्मिथला केवळ 3 धावांवर झेलबाद केले. सेल्सने ग्रीनला बाद करुन ऑस्ट्रेलियावर अधिकच दडपड आणले. ग्रीनने 37 चेंडूत 4 चौकारांसह 26 धावा जमविल्या. ग्रीन आणि हेड यांनी चौथ्या गड्यासाठी 43 धावांची भर घातली. जोसेफनने ऑस्ट्रेलियाच्या हेडला हॉपकरवी झेवलबाद केले. त्याने 43 चेंडूत 3 चौकारांसह 39 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 26.3 षटकात 110 धांवर बाद झाला होता. उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने 23 षटकात 4 बाद 93 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर पावसाळाचा अडथळा आल्याने खेळ काहीवेळ थांबवावा लागला.
शतकी भागिदारी
वेबस्टर आणि कॅरे या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव चांगलाच सावरला. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 112 धावांची शतकी भागिदारी केली. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाने 48 षटकात 5 बाद 209 धावा जमविल्या होत्या. वेबस्टर 43 तर कॅरे 51 धावांवर खेळत होते. कॅरेने आपले अर्धशतक 68 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने झळकविले. चहापानानंतर कॅरे आणि वेबस्टर यांनी सहाव्या गड्यासाठी शतकी भागिदारी 136 चेंडूत पूर्ण केली. वेबस्टरने 87 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक झळकविले. ग्रीव्हेसने कॅरेला झेलबाद केले. त्याने 81 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 63 धावा जमविल्या. जोसेफने कर्णधार कमिन्सचा त्रिफळा उडविला. त्याने 3 चौकारांसह 17 धावा केल्या. सेल्सने स्टार्कला 6 धावांवर झेलबाद केले. वेबस्टर चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. त्याने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 60 धावा केल्या. जोसेफने लियॉनला 11 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव 66.5 षटकात 286 धावांवर रोखला. पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ 23 षटके बाकी असताना थांबविण्याचा निर्णय घेतला. विंडीजतर्फे अल्झारी जोसेफ 61 धावांत 4, सेल्सने 45 धावांत 2 तर शमार जोसेफ, फिलीप आणि ग्रिवेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 66.5 षटकात सर्वबाद 286 (कॅरे 63, वेबस्टर 60, ग्रीन 26, हेड 29, कोनस्टास 25, कमिन्स 17, ख्वॉजा 16, हॅजलवूड नाबाद 10, लियॉन 11, अवांतर 20, अल्झारी जोसेफ 4-61, सेल्स 2-45, शमार जोसेफ, फिलीप व ग्रिवेस प्रत्येकी 1 बळी).