For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विंडीजच्या निकोलस पूरनची अनपेक्षित निवृत्ती

06:37 AM Jun 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
विंडीजच्या निकोलस पूरनची अनपेक्षित निवृत्ती
Advertisement

वृत्तसंस्था / पोर्ट ऑफ स्पेन

Advertisement

विंडीजचा भरवशाचा फलंदाज निकोलस पूरनने मंगळवारी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत अनपेक्षित धक्का दिला. 29 वर्षीय पूरनने मात्र आपल्या निवृत्तीचे कारण स्पष्ट केले नाही.

इंग्लंड बरोबर सध्या सुरू असलेल्या टी-20 मालिकेतून त्याने माघार घेतली होती. यानंतर काही दिवसांतच पूरनने निवृत्तीचा निर्णय घोषित केला. डावखुरा फलंदाज पूरनने टी-20 प्रकारात विंडीजतर्फे सर्वाधिक सामने खेळले आहेत. पूरनने 106 टी-20 सामन्यात विंडीजचे प्रतिनिधीत्व करताना 26.14 धावांच्या सरासरीने तसेच 136.39 स्ट्राईक रेटने सर्वाधिक 2275 धावा जमविल्या आहेत. तसेच त्याने 61 वनडे सामन्यात 39.66 धावांच्या सरासरीने तसेच 99.15 स्ट्राईक रेटने 1983 धावा केल्या आहेत. विंडीजच्या वनडे संघाचा पूरन हा माजी कर्णधार होता. क्रिकेटवर माझे नितांत प्रेम असून या क्षेत्रातील काही अविस्मरणीय घटना सदैव मला आनंद देणाऱ्या असल्याचे पूरनने सोशल मिडीयावर सांगितले.

Advertisement

त्रिनिदादच्या निकोलस पूरनने 2016 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-20 प्रकारात आपले पदार्पण केले. मात्र त्याने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत एकदाही विंडीजचे कसोटी सामन्यात प्रतिनिधीत्व केलेले नाही. पूरनने 2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधीत्व केले. या आयपीएल हंगामात सर्व सामन्यात भाग घेतला. 2023 आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी विंडीजचा संघ पात्र ठरु शकला नाही. त्यानंतर पूरनने एकही वनडे सामना विंडीजकडून खेळलेला नाही. पूरनने 2024 च्या डिसेंबरमध्ये आपला शेवटचा सामना किंग्जटाऊन येथे बांगलादेशविरुद्ध खेळला होता. विंडीज संघातील सहकारी, क्रिकेट चाहते आणि कुटुंबीय यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच आपल्याला क्रिकेटचा हा प्रवास अधिक सुखकर करता आल्याबद्दल त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झालो असलो तरी माझे विंडीजच्या क्रिकेटवर पूर्वीइतकेच प्रेम राहिल, असे म्हणत विंडीज संघाला त्याने शुभेच्छाही दिल्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेणारा पूरन यापुढे काही प्रमुख लीग क्रिकेट स्पर्धा, द हंड्रेड स्पर्धा, कॅरेबियन प्रिमीयर लीग तसेच आयपीएल आणि संयुक्त अमिरातमधील आयएल टी-20 स्पर्धेमध्ये खेळणार असल्याचे त्याच्या एका निकटवर्तीयाने सांगितले. 2024 चा क्रिकेट हंगाम हा पूरनला सर्वात यशस्वी ठरला असून त्याने या हंगामात 170 षटकार ठोकले आहेत. 2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत त्याने लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना पाच अर्धशतकांसह 524 धावा जमविल्या. पुढील वर्षीच्या प्रारंभी होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पूरन हा विंडीज संघाकडून दर्जेदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा बाळगत असतानाच मंगळवारी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर करुन विंडीज क्रिकेट मंडळाला धक्का दिला. निकोलस हा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला गेला. बऱ्याच सामन्यामध्ये त्याने गेम चेंजरची भूमिका यशस्वीपणे पार पाडली. विंडीज क्रिकेट मंडळाने पूरनच्या योगदानाचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Tags :

.