विंडीजची वनडे मालिकेत विजयी सलामी
बांगलादेशचा 5 गड्यांनी पराभव, रुदरफोर्ड ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / बॅसेटेरी
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान विंडीजने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 14 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली. विंडीजच्या रुदरफोर्डला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 294 धावा झळकविल्या. त्यानंतर विंडीजने 47.4 षटकात 5 बाद 295 धावा जमवित हा सामना 5 गड्यांनी जिंकला.
बांगलादेशच्या डावामध्ये तानझीद हसन तसेच कर्णधार मेहदी हसन मिराज व मेहमुद्दूल्ला यांनी शानदार अर्धशतके झळकविली. हसनने 60 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 60, मेहदी हसन मिराजने 101 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 74, मेहमुद्दूल्लाने 44 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 50, जाकर अलीने 40 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 48 सरकारने 3 चौकारांसह 19 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 10 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे शेफर्डने 51 धावांत 3 तर अल्झारी जोसेफने 67 धावांत 2 आणि सेल्सने 63 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना रुदरफोर्डने दमदार शतक नोंदवित आपल्या संघाच्या विजयाला हातभार लावला. कर्णधार शाय हॉप आणि रुदरफोर्ड या जोडीने चौथ्या गड्यासाठी 99 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी हॉप आणि कार्टी यांनी तिसऱ्या गड्यासाठी 67 धावांची भर घातली होती. हॉप तंबुत परतल्यानंतर रुदरफोर्डला ग्रिव्हेसने चांगली साथ दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 95 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला 14 चेंडू बाकी असताना विजय मिळवून दिला. रुदरफोर्डने 80 चेंडूत 8 षटकार आणि 7 चौकारांसह 113, हॉपने 88 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 86, ग्रिव्हेसने 31 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 41, कार्टीने 37 चेंडूत 2 चौकारांसह 21, लेव्हीसने 3 चौकारासह 16 आणि किंगने 2 चौकारांसह 9 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 12 षटकार आणि 22 चौकारा नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे शकीब, नाहीद राणा, रिशाद हुसेन, मेहदी हसन मिराज आणि सरकार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. रुदरफोर्डचे वनडे क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश 50 षटकात 6 बाद 294 (मेहदी हसन मिराज 74, टी. हसन 60, मेहमुद्दूल्ला 50, जाकरअली 48, अवांतर 13, अल्झारी जोसेफ 2-67, शेफर्ड 3-51, सेल्स 1-63), विंडीज 47.4 षटकात 5 बाद 295 (एस. रुदरफोर्ड 113, हॉप 86, ग्रिव्हेस 41, कार्टी 21, लेव्हीस 16, शकीब, नाहीद राणा, आर. हुसेन, मेहदी हसन मिराज आणि सरकार प्रत्येकी 1 बळी)