कॉन्स्टासच्या तडाख्यानंतर बुमराहचा पलटवार
कांगारुंच्या चार फलंदाजांची अर्धशतके, पहिल्या दिवशी 6 बाद 311 : बुमराहचे 3 बळी
वृत्तसंस्था/ मेलबर्न
येथील एमसीजी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 6 विकेट गमावत 311 धावा केल्या आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात कांगारुंनी वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघाने अखेरच्या सत्रात दमदार पुनरागमन केले. युवा फलंदाज सॅम कॉन्स्टासच्या सुरुवातीच्या तडाख्यानंतर टीम इंडिया बॅकफूटवर होती. त्यानंतर जसप्रीत बुमराहने पलटवार केला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्टीव्ह स्मिथ 68 तर पॅट कमिन्स 8 धावांवर खेळत होता. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवशी चार फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. त्यात सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियन स्कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. नवा सलामीवीर पदार्पण करत असतानाही कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरला. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा सलामीला आले आणि मालिकेत पहिल्यांदाच दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके झळकावली. बॉक्सिंग डे कसोटीमध्ये कॉन्स्टासने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. त्याने अपेक्षेप्रमाणे अचूक कामगिरी केली. काही चेंडूंचा सामना केल्यानंतर कॉन्स्टासने मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहवर आक्रमण केले. त्याने केवळ 52 चेंडूत 50 धावा केल्या आणि 65 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारासह 60 धावांची खेळी केली. जडेजाने त्याला बाद करत टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले.
लाबुशेन, ख्वाजाची अर्धशतके,
युवा फलंदाज कॉन्स्टासने धमाकेदार खेळी साकारल्यानंतर उर्वरित फलंदाजांचे मनोबलही वाढले आणि त्यांनी अर्धशतके झळकावली. कॉन्स्टासशिवाय खराब फॉर्ममधून जात असलेल्या उस्मान ख्वाजाने 121 चेंडूत 6 चौकारासह 57 धावा केल्या आणि लाबुशेनने 145 चेंडूत 7 चौकारासह 72 धावांचे योगदान दिले.
हेड सपशेल फेल, बुमराहचा पलटवार
तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीला आला तेव्हा संघाने 2 गडी गमावून 237 धावा केल्या होत्या. यानंतर जसप्रीत बुमराहने सलग दोन विकेट घेत टीम इंडियाचे पुनरागमन केले. प्रथम वॉशिंग्टन सुंदरने लाबुशेनची शिकार केली. त्यानंतर बुमराहने धोकादायक ट्रॅव्हिस हेडला शुन्यावर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. डावातील 67 व्या षटकात बुमराहने या कसोटी मालिकेत दमदार फॉर्ममध्ये असलेल्या हेडचा त्रिफळा उडवला. मिचेल मार्शला 4 धावांवर माघारी पाठवले. अॅलेक्स केरीचा अडथळा आकाशदीपने दूर केला. केरीने 31 धावा फटकावल्या. दुसरीकडे, अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथने मात्र संयमी खेळी साकारताना 111 चेंडूत 5 चौकार व 1 षटकारसह नाबाद 68 धावांची खेळी साकारली. स्मिथने एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाचे त्रिशतक फलकावर लावले. त्याला पॅट कमिन्सने 8 धावा करत चांगली साथ दिली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कांगारुंनी 86 षटकांत 6 गडी गमावत 311 धावा केल्या होत्या. स्मिथ 68 तर कमिन्स 8 धावांवर खेळत होते. टीम इंडियाकडून बुमराहने तर आकाशदीप, जडेजा व वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 86 षटकांत 6 बाद 311 (सॅम कॉन्स्टास 60, उस्मान ख्वाजा 57, लाबुशेन 72, ट्रेव्हिस हेड 0, मिचेल मार्श 4, अॅलेक्स केरी 31, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे 68, पॅट कमिन्स खेळत आहे 8, बुमराह 3 तर सुंदर, जडेजा व आकाशदीप प्रत्येकी एक बळी).
19 वर्षीय सॅम कॉन्स्टासला धक्का मारणे विराटला पडले महागात
मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉन्स्टासशी पंगा घेणे विराट कोहलीला चांगलेच महागात पडले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मॅच रेफरीने या घटनेची दखल घेतली आणि कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. गेल्या 24 महिन्यांतील कोहलीचा हा पहिला डिमेरिट पॉइंट आहे. अशा परिस्थितीत त्याचे कोणतेही मोठे नुकसान होणार नाही.
ऑस्ट्रेलियाच्या डावाची 10 षटके संपल्यानंतर ब्रेक दरम्यान, जेव्हा कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा स्ट्राईक बदलत होते, तेव्हा कोहलीही जागा बदलत होता आणि यादरम्यान चालता चालता कॉन्स्टास आणि विराट एकमेकांना धडकले. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक युद्धही पहायला मिळाले. यावेळी पंचांनी व उस्मान ख्वाजाने पुढे येत हा वाद मिटवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मॅच रेफरी विराटशी संपूर्ण घटनेबद्दल बोलले. माजी भारतीय कर्णधाराने आपली चूक मान्य केली आणि त्यामुळे प्रकरण पुढे गेले नाही. त्याला 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आणि एक डिमेरिट पॉइंट देऊन सोडून देण्यात आले.
1112 दिवसानंतर बुमराहचा विक्रम मोडित
जसप्रीत बुमराह क्रिकेट जगतातील महान गोलंदाजांपैकी एक आहे. जेव्हा जेव्हा टीम इंडिया कठीण परिस्थितीत सापडते तेव्हा तेव्हा भारतीय कर्णधार बुमराहकडे मदतीसाठी वळतो. टीम इंडिया मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्ट मॅच खेळत आहे. या सामन्यादरम्यान बुमराहचा एक वारसा तुटला. बुमराहविरुद्ध धावा करणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसते, पण या 19 वर्षीय खेळाडूने बुमराहविरुद्ध धावा सहज केल्या. या सामन्यात त्याने दोन षटकार मारले. त्याने हे दोन्ही षटकार बुमराहविरुद्ध मारले आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बुमराहला दोन षटकार मारणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला. बुमराहविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये, एका फलंदाजाने 4483 चेंडूत, 1112 दिवस म्हणजे 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर पहिल्यांदा षटकार ठोकला. याआधी 2021 मध्ये सिडनी कसोटीत कॅमरुन ग्रीनने बुमराहला षटकार लगावला होता. यानंतर ही किमया युवा कॉन्स्टासने केली आहे.
एमसीजी स्टेडियम पहिल्याच दिवशी हाऊसफुल
बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी एक मोठा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. वास्तविक, पहिल्या दिवशी चाहते तब्बल 87,242 चाहते मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पोहोचले होते. त्यामुळे संपूर्ण स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, बॉक्सिंग डे टेस्टमध्ये चाहत्यांच्या उपस्थितीचा हा एक नवीन