For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन दिवसात विंडीजचा गेमओव्हर

06:37 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन दिवसात विंडीजचा गेमओव्हर
Advertisement

पहिल्या कसोटीत कांगारुंचा दहा गडी राखून दणदणीत विजय : शतकवीर ट्रेव्हिस हेड सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ अॅडलेड

येथे खेळवल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 10 विकेट्स राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघासमोर विजयासाठी केवळ 26 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी एकही विकेट न गमावता सहज गाठले. सामन्यात 9 बळी घेणाऱ्या जोस हेझलवूडला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. या विजयासह कांगारुंनी दोन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र असेल आणि 25 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे खेळवला जाईल.

Advertisement

प्रारंभी, ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार कमिन्सचा हा निर्णय ऑसी गोलंदाजांनी सार्थ ठरवताना अवघ्या दोन दिवसातच सामना संपवला. दोन दिवसाच्या या कसोटी सामन्यात विंडीज खेळाडू कुठेही प्रतिकार करताना दिसून आले नाहीत. वेस्ट इंडिज संघाने पहिल्या डावात 188 धावा केल्या होत्या. या सामन्यात त्यांच्या तीन खेळाडूंने पदार्पण केले, त्यापैकी शामर जोसेफने 36 धावांची खेळी केली. याशिवाय अनुभवी फलंदाज कर्क मॅकेन्झी यानेही 50 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड याने प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 283 धावा केल्या आणि 95 धावांची आघाडी घेतली. एकेकाळी संघ अडचणीत असताना मधल्या फळीत ट्रेव्हिस हेडने 119 धावांची जबरदस्त खेळी करत संघाला आघाडी मिळवून दिली. उस्मान ख्वाजाने 45 धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून पदार्पण करणारा युवा वेगवान गोलंदाज शामर जोसेफने पदार्पणाच्या सामन्यातच पाच विकेट्स घेत एक मोठा विक्रम केला. जोसेफच्या भेदक माऱ्यासमोर ऑसी संघाचा पहिला डाव 283 धावांवर संपुष्टात आला.

दुसऱ्या डावातही विंडीजचे लोटांगण

दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या कॅरेबियन संघाला फारशी टक्कर देता आली नाही आणि ते केवळ 120 धावांपर्यंतच मर्यादित राहिले. कर्क मॅकेन्झीने पुन्हा एकदा संघासाठी सर्वाधिक 26 धावा केल्या. याशिवाय, युवा खेळाडू जस्टीन ग्रेव्हजने 24 तर अल्झारी जोसेफने 16 धावा केल्या. पण बाकीचे फलंदाज फ्लॉप ठरले. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज हॅजलवूडने दुसऱ्या डावात अप्रतिम गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे यजमान संघाला विजयासाठी 26 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी सहज गाठले. स्टीव्ह स्मिथ 11 धावांवर नाबाद राहिला आणि लॅबुशेन 1 धावावर नाबाद राहिला. उस्मान ख्वाजा 9 धावा करून रिटायर्ड हट झाला.

संक्षिप्त धावफलक : विंडीज पहिला डाव 188 व दुसरा डाव 35.2 षटकांत सर्वबाद 120 (मॅकन्झी 26, ग्रेव्हज 24, जोसेफ 16, हॅजलवूड 35 धावांत 5 बळी, स्टार्क व नॅथन लियॉन प्रत्येकी दोन बळी).

ऑस्ट्रेलिया पहिला डाव 283 व दुसरा डाव 6.4 षटकांत बिनबाद 26 (स्टीव्ह स्मिथ नाबाद 11, लाबुशेन नाबाद 1)

Advertisement
Tags :

.