अडीच दिवसांत विंडीजचा ‘करेक्ट कार्यक्रम’
पहिल्या कसोटीत भारताचा विंडीजवर 1 डाव आणि 140 धावांनी विजय : सामनावीर जडेजाची अष्टपैलू खेळी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला पहिल्याच कसोटीत अडीच दिवसात हरवण्याचा पराक्रम केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजवर एक डाव 140 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा व शेवटचा सामना दि. 10 ऑक्टोबरपासून नवी दिल्लीत खेळवला जाईल. सामन्यात शतकी खेळी आणि 4 बळी घेणाऱ्या रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच पहिला डाव 448 धावांवर घोषित करताना 286 धावांची मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजसमोर ही पिछाडी भरून काढून भारतासमोर लक्ष्य ठेवण्याचे आव्हान होते. मात्र त्यांचा संघ दुसऱ्या डावात 45.1 षटकात 146 धावांवरच सर्वबाद झाला. विंडीजवरील या दणदणीत विजयामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेतही फायदा झाला आहे. विशेष म्हणजे, कर्णधार म्हणून गिलचाही हा भारतातील पहिलाच सामना होता.
पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण तो त्यांच्यासाठी विनाशकारी ठरला. संपूर्ण संघ फक्त 162 धावांतच आटोपला. यानंतर भारतीय फलंदाजांनी धमाकेदार प्रदर्शन केले. के.एल. राहुल (100), ध्रुव जुरेल (125) आणि रवींद्र जडेजा (104) यांनी शतकी खेळी केली. कर्णधार शुभमन गिलने अर्धशतक झळकावले. दुसऱ्या दिवसअखेर जडेजा 104 आणि वॉशिंग्टन सुंदर 9 धावांवर नाबाद होते. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने 448/5 धावांवर डाव घोषित केला.
विंडीजचे सपशेल लोटांगण
दुसऱ्या डावातही विंडीजच्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातल्याचे पहायला मिळाले. तिसऱ्या दिवशी सामन्याच्या सुरुवातीला भारताने आपला पहिला डाव 5 बाद 448 धावांवर घोषित केला. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेले विंडीजचे फलंदाज रवींद्र जडेजाच्या फिरकीपुढे चांगलेच गडबडल्याचे दिसले. पहिल्याच सत्रात त्यांचा अर्धा संघ पॅव्हेलियनममध्ये परतला होता. तेजनारायण चंद्रपॉलला आधी 8 व्या षटकात मोहम्मद सिराजने बाद केले. अॅलिक अथानाझे (38 धावा) आणि जस्टिन ग्रीव्हज (25 धावा) यांनी काही धावा केल्या. तर, शेवटी जेडेन सील्सने (22 धावा) फटकेबाजी केली. पण इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे त्यांचा दुसरा डाव 45.1 षटकांत 146 धावांत आटोपला. भारताकडून रवींद्र जडेजाने 4 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराजने 3, कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरलाही 1 विकेट मिळाली.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज पहिला डाव 162 आणि दुसरा डाव 45.1 षटकांत सर्वबाद 146 (कॅम्पबेल 14, अथानाझे 38, जस्टीन ग्रीव्हज 25, पिरे नाबाद 13, जेडेन सील्स नाबाद 22, जडेजा 54 धावांत 4 बळी, सिराज 31 धावांत 3 बळी, कुलदीप यादव 2 बळी)
भारत पहिला डाव 128 षटकांत 5 बाद 448 घोषित (यशस्वी जैस्वाल 36, केएल राहुल 100, शुभमन गिल 50, ध्रुव जुरेल 125, जडेजा नाबाद 104, सुंदर नाबाद 9, रोस्टन चेस 2 बळी, सील्स, ग्रेव्हज, वॉरिकन प्रत्येकी 1 बळी).
टीम इंडियाचा विजय, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम
भारताने वेस्ट इंडिजला डावाच्या फरकाने हरवले तरी त्यांना sंऊण् पॉइंट्स टेबलमध्ये या विजयाचा फायदा होणार नाही. भारत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे आणि या विजयानंतरही तिसऱ्या स्थानावर राहील. पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलियन संघ कायम असून श्रीलंकन संघ दुसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानी इंग्लंड असून पाचव्या स्थानी बांगलादेश आहे. याशिवाय, विंडीज संघाला मात्र अद्याप खाते उघडता आलेले नाही.