विंडीजचे कमबॅक, अमेरिकेवर एकतर्फी मात
वर्ल्डकपमधून अमेरिकेचे पॅकअप : विंडीजच्या विजयामुळे इंग्लंडला धक्का : ब गटात नेट रनरेट ठरणार सरस
वृत्तसंस्था/ बार्बाडोस, वेस्ट इंडिज
बार्बाडोसमधील ब्रिजटाऊनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने अमेरिकेचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेचा संघ 128 धावा करुन ऑलआऊट झाला. विंडीजने 129 धावांचे लक्ष्य अवघ्या 10.5 षटकात 1 गडी गमावून गाठले. या विजयासह विंडीजने आपल्या नेट रनरेटमध्ये जबरदस्त सुधारणा करत उपांत्य फेरीच्या शर्यतीतील आव्हान देखील कायम राखले
आहे. सलग दोन पराभवामुळे मात्र अमेरिकेचा संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. आता, विंडीजची पुढील लढत दि. 24 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. 19 धावांत 3 बळी घेणाऱ्या रोस्टन चेसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
प्रारंभी, विंडीज कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तो अगदी योग्य ठरला. अमेरिकेच्या डावाची सुरुवातच खराब झाली. दुसऱ्याच षटकात रसेलने स्टीव्हन टेलरला बाद करत अमेरिकेला पहिला धक्का दिला. यानंतर आंद्रेस गॉस व नितीश कुमार यांनी 48 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. गॉसने 16 चेंडूत 29 तर नितीश कुमारने 19 चेंडूत 20 धावा केल्या. ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर मात्र अमेरिकेचा संपूर्ण संघ कोलमडला आणि 19.5 षटकांत 128 धावांवर ऑलआऊट झाला. विंडीज गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर अमेरिकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. कर्णधार अॅरॉन जोन्स, कोरी अँडरसन या अनुभवी फलंदाजाकडून अपेक्षा होत्या पण ते ही अपयशी ठरले. विंडीजकडून आंद्रे रसेल व रोस्टन चेस यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. याशिवाय, अल्झारी जोसेफने दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
शाय होपची तुफानी खेळी, विंडीजचा 11 षटकांतच विजय
सुपर 8 च्या पहिल्या लढतीत वेस्ट इंडिजचा सलामीवीर ब्रँडन किंग दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या जागी शाय होपला सलामीला येण्याची संधी मिळाली. शाय होप व जॉन्सन चार्ल्स या जोडीने विंडीजला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. होपने मिळालेल्या संधीचे सोने करताना अमेरिकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने 39 चेंडूत 4 चौकार व 8 षटकारासह नाबाद 82 धावा फटकावत विजयात मोलाचे योगदान दिले. जॉन्सन चार्ल्स 15 धावा काढून बाद झाला. यानंतर निकोलस पूरनने 12 चेंडूत 1 चौकार व 3 षटकारासह नाबाद 27 धावा करत त्याला चांगली साथ दिली. विंडीजने 9 विकेट्स व 55 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक
अमेरिका 19.5 षटकांत सर्वबाद 128 (आंद्रेस गॉस 29, नितीश कुमार 20, मिलिंद कुमार 19, शॅडले व्हॅन 18, आंद्रे रसेल व रोस्टन चेस प्रत्येकी तीन बळी, जोसेफ दोन बळी).
वेस्ट इंडिज 10.5 षटकांत 1 बाद 130 (शाय होप 39 चेंडूत नाबाद 82, जॉन्सन चार्ल्स 15, निकोलस पूरन नाबाद 27, हरमीत सिंग एक बळी).
ख्रिस गेलचा 12 वर्ष जुना मोडला, निकोलस पूरनची ऐतिहासिक कामगिरी
शनिवारी यजमान विंडीजने अमेरिकेवर एकतर्फी विजय मिळवत आपले आव्हान कायम राखले आहे. या सामन्यात निकोलस पूरनने 12 चेंडूत 1 चौकार व 3 षटकारासह नाबाद 27 धावा केल्या. यासह पूरनने टी 20 वर्ल्डकपमध्ये ऐतिहासिक कामगिरी साकारली. निकोलस पूरन आता एका टी 20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे. हा रेकॉर्ड गेल्या 12 वर्षांपासून ख्रिस गेलच्या नावे होता. पूरनने या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 17 षटकार लगावले आहेत. याआधी ख्रिस गेलने 2012 टी 20 विश्वचषकामध्ये एकूण 16 षटकार लगावले होते. त्याचा हा रेकॉर्ड तब्बल 12 वर्ष कायम राहिला.
एका टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे खेळाडू
- निकोलस पूरन (वेस्ट इंडिज) - 17 षटकार, 2024
- ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) - 16 षटकार, 2012
- शेन वॅटसन (ऑस्ट्रेलिया) - 15 षटकार, 2012
- मर्लोन सॅम्युअल्स (वेस्ट इंडिज) - 15 षटकार, 2012.
ब गटात काँटे की टक्कर, आफ्रिका, विंडीज व इंग्लंडमध्ये मोठी चुरस
सध्याच्या घडीला ब गटात दक्षिण आफ्रिका संघ 4 गुणासह अव्वलस्थानी आहे. दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिज असून इंग्लंड तिसऱ्या तर अमेरिका चौथ्या स्थानी आहे. विंडीज व इंग्लंडचे समसमान म्हणजेच प्रत्येकी दोन गुण आहेत. पण, कॅरेबियन संघाचा नेट रनरेट इंग्लिश संघापेक्षा सरस आहे. आता, ब गटात इंग्लंडचा सामना अमेरिकेविरुद्ध तर आफ्रिकेचा सामना विंडीजविरुद्ध होणार आहे. अमेरिकेविरुद्ध विजय मिळवून इंग्लंडला नेट रनरेट चांगला ठेवावा लागेल. कारण नेट रनरेटच्या बाबतीत वेस्ट इंडिज आघाडीवर आहे. त्यामुळे नुसता सामना जिंकून चालणार नाही तर नेट रनरेटही चांगला ठेवावा लागेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा सामना वेस्ट इंडिजसोबत आहे. आफ्रिकेला विंडीजविरुद्ध सामना काहीही करून जिंकावाच लागेल. हा सामना जिंकला तर आफ्रिकेला थेट एन्ट्री मिळेल. पण गमावला तर वेस्ट इंडिज आणि इंग्लंडपेक्षा नेट रनरेट चांगला राहिला पाहिजे. याशिवाय, विंडीजचे गणितही इंग्लंडसारखेच आहे. शेवटचा सामना जिंकला तर पाहिजे पण नेट रनरेटही चांगला असणं गरजेचं आहे. विंडीजने दक्षिण अफ्रिकेला पराभूत केले, दुसरीकडे इंग्लंडने अमेरिकेला पराभूत केले तर तीन संघांचे प्रत्येकी 4 गुण होतील. यामुळे उपांत्य फेरीच्या दोन संघांचे गणित नेट रनरेटच्या आधारावर होईल. एकंदरीत ब गटात काँटे की टक्कर पहायला मिळणार आहे.