विंडीज-अफगाण टी-20 मालिका जानेवारीत
वृत्तसंस्था / सेंटजोन्स
विंडीज आणि अफगाण यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका संयुक्त अरब अमिरातमध्ये जानेवारी महिन्यात खेळविली जाणार आहे. सदर माहिती क्रिकेट विंडीजतर्फे मंगळवारी जाहीर करण्यात आली.
या मालिकेतील पहिला सामना 19 जानेवारीला शारजा क्रिकेट मैदानावर होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 21 आणि 22 जानेवारीला शारजा क्रिकेट मैदानावरच खेळविला जाईल. सदर माहिती क्रिकेट विंडीजचे संचालक मिलेश बॅस्कोंब यांनी पत्रकार परिषदेत दिली. 2026 मध्ये आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारत आणि लंका यांच्या संयुक्त यजमानपदाने भरविली जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेपुर्वी संघाला सराव मिळावा या हेतुने ही मालिका आयोजित केली आहे. आयसीसीच्या यापूर्वी झालेल्या शेवटच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे सहयजमानपद विंडीजने भूषविले होते. विंडीज संघाने या स्पर्धेत सुपर-8 फेरी गाठली होती. पण त्यांना बाद फेरीत प्रवेश करता आला नव्हता. पण अफगाणने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत पहिल्यांदाच मजल मारत नवा पराक्रम केला होता. विंडीज आणि अफगाण यांच्यात आतापर्यंत टी-20 चे आठ सामने झाले असून त्यामध्ये पाच सामने विंडीजने तर तीन सामने अफगाणने जिंकले आहेत. विंडीजचा क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर पाचसामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर न्यूझीलंड आणि विंडीज यांच्यात तीन कसोटी सामने आणि तीन वनडे सामने खेळविले जाणार आहेत. विंडीज संघाचा हा न्यूझीलंड दौरा 22 डिसेंबरला संपणार आहे.