न्यूझीलंड संघात विलियमसनचे पुनरागमन
वृत्तसंस्था / वेलिंग्टन
विंडीजचा क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. आता यजमान न्यूझीलंड आणि विंडीज यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 2 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. क्रिकेट न्यूझीलंडने पहिल्या सामन्यासाठी 14 सदस्यांचा संघ जाहीर केला असून माजी कर्णधार आणि फलंदाज केन विलियमसनचे पुनरागमन झाले आहे.
गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विलियमसन दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. विंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचे नेतृत्व यष्टीरक्षक आणि फलंदाज टॉम लॅथमकडे सोपविण्यात आले आहे. यासंघामध्ये वेगवान गोलंदाज डफी, फोकेस, टिकनेर, मॅट हेन्री आणि नाथन स्मिथ यांनाही संधी दिली आहे. 2023 नंतर पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या कसोटी संघामध्ये टिकनेरचे पुनरागमन होत आहे. झिम्बाब्वेच्या दौऱ्यात डफी आणि फोकेस यांची कामगिरी महत्त्वाची ठरली होती. तर गॅरीयल मिचेल किरकोळ दुखापतीतून आता पूर्ण बरा झाला आहे. दरम्यान कायली जेमिसन व ग्लेन फिलीप्स यांना मात्र कसोटी संघात स्थान मिळू शकले नाही. उभय संघातील ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत राहील. उभय संघातील दुसरी कसोटी 10 डिसेंबरपासून होणार आहे तर उभय संघातील तिसरी कसोटी टॉरेंगा येथे 18 डिसेंबरपासून सुरू होईल.
न्यूझीलंड कसोटी संघ: टॉम लेथम (कर्णधार), ब्लंडेल, ब्रेसवेल, कॉन्वे, डफी, फोकेस, मॅट हेन्री, डॅरियल मिचेल, रचिन रविंद्र, मिचेल सँटेनर, नाथन स्मिथ, टिकनेर, केन विलियमसन आणि विल यंग.