विजयेंद्र यांनाही प्रदेशाध्यक्ष पदावरून खाली उतरविण्यात येईल?
कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य यांचा प्रश्न
कारवार : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना न सोडलेले भाजपवाले येडियुरप्पा यांचे पुत्र आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना सहजासहजी सोडणार आहेत का? असा प्रश्न कारवार जिल्हा पालकमंत्री आणि मच्छीमारी व बंदर खात्याचे मंत्री मंकाळू वैद्य यांनी उपस्थित केला. ते शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास भाजप वाल्यांनीच भाग पाडले. आता लवकरच विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून खाली उतरविण्यात येईल. भाजपच्या नेत्यांनी यापूर्वीच विजयेंद्र यांच्या नेमणुकीबद्दल असमाधान व्यक्त केले आहे. आम्ही करायचे कार्य भाजप नेत्यांकडून केले जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हीच 28 पैकी 28 जागांवर बाजी मारणार, असा दावा भाजपकडून केला जात आहे. गेल्या निवडणुकीत चुकीने 28 पैकी 27 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. यावेळी 28 पैकी 28 जागांवर काँग्रेस उमेदवार बाजी मारणार आहेत, असा विश्वास व्यक्त करून मंत्री वैद्य यांनी काँग्रेसचे 136 आमदार आहेत आणि सर्व आमदार एकत्रित काम करून भाजप उमेदवारांना चितपट करणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने, निजदशी युती केली होती. त्यामुळे काँग्रेसची पिछेहाट झाली होती. आता भाजपने निजदशी युती केली आहे. त्यामुळे आता निश्चितपणे भाजपची पिछेहाट होणार आहे. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केवळ टीका करण्याची कला आत्मसात केली आहे. टीका करण्यापलीकडे त्यांना दुसरे काही जमत नाही. वीज चोरी प्रकरणी कोणत्याही प्रकारची हयगय किंवा तडजोड न करता कुमारस्वामी यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची हिमत काँग्रेस सरकारने दाखविली आहे.
सहा महिन्यांपासून पाहतोय तत्पूर्वी येथील जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित केलेल्या दुष्काळ मॅनेजमेंट आढावा बैठकीत बोलताना मंत्री वैद्य म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून मी शासकीय अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर बारीक नजर ठेऊन आहे. अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर आपण समाधानी नाही. सहा महिने आपण अधिकाऱ्यांना संधी दिली. यापुढे संधी नव्हे तर थेट कारवाई केली जाईल. काही अधिकारी जिल्ह्यातीलच आहेत. घरापासून कार्यालयापर्यंत ये-जा करण्याची संधी देण्यात आलेली आहे. तरीसुद्धा कामगिरी नाही. तुम्हा अधिकाऱ्यांची समस्या काय? असा प्रश्न उपस्थित करून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमुळे गोरगरिबांना समस्यांना तोंड द्यावे लागेल तर आपण स्वस्थ बसणार नाही. समाजातील शेवटच्या नागरिकापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे. विकासकामांच्या बाबतीत गेल्यावर्षी जेथे काम केलात त्याच ठिकाणी यावर्षीही काम करत असाल तर तुमची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करून प्रत्येक व्यक्तीला पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवल्यास चोवीस तासात पाणी उपलब्ध करून द्या. अन्यथा कारवाईला सामोरे जायची तयारी ठेवा, असा इशारा पुढे दिला. यावेळी जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर उपस्थित होत्या.