For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाल्मिक कराड पोलिसांना शरण येणार ?

06:33 AM Dec 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाल्मिक कराड पोलिसांना शरण येणार
Advertisement

भाजप आणि मित्रपक्षाला बलाढ्या बहुमत मिळाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विकासही राज्यात बहुमताप्रमाणे बलाढ्या झाला पाहिजे, राजकारण कमी आणि विकास अधिक व्हावा अशी राज्यातील जनतेची सरकारकडून अपेक्षा असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याच सरकारमधील मित्रपक्षातील नेत्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या तसेच दोन कोटी ऊपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील तपासाला आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदेशावरून वाल्मिक कराड यांच्या सर्व बँकेतील अकाऊंट गोठवण्याचे आणि कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. आता वाल्मिक कराड हा कधीही पोलिसांना शरण येऊ शकतो, कराड शरण आल्यावर पोलीस तपासात कोणकोणते गौप्यस्फोट करणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा सहा दिवसाचेच होते, मात्र या अधिवेशनात मराठवाड्यातील दोन हत्याकांडे गाजली. त्यापैकी एक होते परभणी येथे उसळलेल्या जनउद्रेकाचा आरोपी म्हणून अटक केलेल्या सोमनाथ सुर्यवंशींचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यु तर दुसरा मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण कऊन झालेली हत्या, यातील देशमुख यांच्या हत्याप्रकरणाशी संबंधित खंडणीचा आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांवऊन मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत. गेल्या वीस दिवसात बीडमधील गुन्हेगारीचे नवनवे किस्से माध्यमासमोर येत आहेत. विशेष म्हणजे यात जिह्यातील धनंजय मुंडे आणि त्यांच्या निकटतर्वीयांचे नाव पुढे येत आहे. जिह्यातील सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे सर्व आमदारांनी धनंजय मुंडे यांची चांगलीच कोंडी केली आहे. सरकार धनंजय मुंडे यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकाकंडून केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर हे पहिलेच प्रकरण आहे, ज्यात सरकारमधील मित्रपक्षामुळे सरकारची गोची झाल्याचे बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, वसुली करणारे मग ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना सोडणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र काही दिवसातच त्यांच्या मित्रपक्षातील नेत्याच्या प्रकरणामुळेच सरकारची कोंडी झाली आहे. फडणवीस यांची यापुढची लढाई ही नाममात्र राहिलेल्या विरोधकांच्या तुलनेत सक्षम असलेल्या मित्रपक्षांसोबतच असणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी बीड येथे शनिवारी झालेल्या मोर्चात विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली, मग यात फडणवीस यांच्या जवळचे माजी आमदार नरेंद्र पाटील असो माजी खासदार छत्रपती संभाजी राजे असो मनोज जरांगे-पाटील असो, जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षिरसागर या सगळ्यांनी फक्त धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी मुंडे यांच्यावर मुंडे यांनी कृषीमंत्री पद आकाला भाड्याने दिल्याचा आरोप केला. इतकेच नाही तर विजय वडेट्टीवार यांनी पाहिजे तर दहा दहा बायका करा पण कोणाचा जीव घेऊ नका अशी टीका केली. राजकारणातील प्रत्येक नेत्यासाठी कोण ना कोण आका काम करत असतो, हा आका तालुक्यापुरता किंवा त्या आमदाराच्या मतदार संघापुरता असतो. जो त्या भागाचा शॅडो आमदारच असतो. आमदाराचा जितका ऊबाब नसतो तितका ह्या आकाचा ऊबाब असतो. बीडमधील आका तालुका सोडून जिह्याचा आका होऊ लागला, त्यात पालकमंत्री, कृषीमंत्री पद मालकाकडे असल्याने पोलीस, प्रशासन सगळंच ताब्यात मग कोणाची धमक आहे अरे ला कारे म्हणण्याची आणि कोणी म्हणले तर मग दहशतीच्या जोरावर त्यांना अद्दल घडवायची. पापाचा घडा भरला की नियती सोडत नसते, मग तो कोणीही असो. या राज्यात पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात राज्याच्या राजकारणातील एकेकाळचे दिग्गज नेते पद्सिंग पाटील यांना तुरूंगात जावे लागले. काळविटाच्या शिकारप्रकरणी राज्याचे तत्कालीन राज्यमंत्री धर्मराव अत्राम यांना मंत्रीपद गमवावं लागलं होतं, एवढंच नव्हे तर त्यांना अटकही झाली होती. संजय राडोठ प्रकरणात काही पुराव्याच्या आधारावर उध्दव ठाकरे यांनी राडोठ यांना मंत्रीपदावऊन बाजुला केले होते. ठाकरे यांनी राठोडांना मी यापुढे तुम्हाला मंत्री करणार नाही. विधानसभेचे तिकीट देऊ शकतो, कारण तुम्हाला लोक निवडणार आहे, तो त्यांचा निर्णय असेल असे थेट निर्वाणीचे सांगितले होते. पण कालांतराने नंतर आणि आता राठोड हे मंत्रीमंडळात आले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कासवगतीने तपास होत असल्याने खमके गृहमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितल्याप्रमाणे या प्रकरणातील सगळी पाळेमुळे खणुन आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी पावले उचलावीत अन्यथा भाजपला लोकांनी इतक्या विश्वासाने बहुमत दिले, त्या बहुमताचा आदर फडणवीसांनी करावा. ज्या ताकदीने निवडणुकीचे मैदान जिंकले त्याच पध्दतीने जलदगतीने तपास कऊन धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे.

आकाची कुऱ्हाड कोणावर चालणार

Advertisement

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशावरून वाल्मिक कराड यांच्या सर्व बँकेतील अकाऊंट गोठवण्याचे व कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. जवळपास 100 जणांची सीआयडीने चौकशी केली आहे. त्यामुळे आता फरार असलेला कराड हा केव्हाही पोलिसांना शरण येऊ शकतो. राजकारणात छोटा मासा हा नेहमी मोठ्या माशासाठी काम करत असतो. जोवर त्याला मोठ्या माशाचे संरक्षण आणि पाठबळ असते तोवर तो काहीही करू शकतो. गळाला आधी छोटा मासाच लागतो, मात्र गळाला लागला तर छोटा मासा हा मोठ्या माशाला पण सोडत नाही. त्यामुळे कराड यांना अटक झाल्यास धनंजय मुंडे अधिक अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. 100 कोटीच्या खंडणी प्रकरणात सचिन वाझे याला अटक झाल्यानंतर वाझे यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख, त्यांचा पीए यांच्यासह सगळ्यांची नावे जाहीर करताना, देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घेण्याचा आरोप केला होता. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील अनेक गौप्यस्फोट केले होते. वाझेंच्या या आरोपानंतर तत्कालीन गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावे लागले. आता कराड यांच्या भोवतीचा फास हा आवळला जात आहे. लवकरच कराड पोलिसांना शरण आल्यास कराडची कुऱ्हाड कोणा कोणावर चालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.