देशाला आव्हान देता काय?
कोलकात्याच्या आर जी कार इस्पितळातील महिला डॉक्टरवरील अत्याचारानंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेली आग विझण्याचे नाव घेत नाही. दररोज आंदोलन, मोर्चे, हिंसाचार चालूच आहे व त्याच धर्तीवर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही तोल जात आहे. पश्चिम बंगालला पंतप्रधान नरेंद्र मोदी आग लावित असल्याचा भन्नाट आरोप त्यांनी केला. एवढा गंभीर आरोप करून त्या थांबलेल्या नाहीत तर बंगालला आग लागली तर ती आसामपासून दिल्लीपर्यंत पसरेल आणि पंतप्रधानांची खुर्ची पडेल, असा जो इशारा त्यांनी दिला, यावरुन ममता बॅनर्जी या आपण एक घटनात्मक पद सांभाळतेय, हे विसरून गेलेल्या दिसत आहेत व अशा तऱ्हेचे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीने आपण कोणत्या पदावर आहोत, याचे भान ठेवलेले नाही. नाहीतरी अत्यंत विक्षिप्त असलेल्या ममता बॅनर्जी यांना भडक निवेदने करण्याची पूर्वीपासून सवय आहे. त्यांनी आणखी एका निवेदनाद्वारे आपल्याला बांगलादेश आवडतो. आमची भाषा व त्यांची भाषा एक आहे परंतु आता बांगलादेश हा स्वतंत्र देश आहे, असे हे निवेदन त्यांनी कोणत्या अर्थाने केले, ती गोष्ट अलहिदा. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी करून लाखो बांगलादेशी तिथे गेली काही वर्षे वास्तव्य करून आहेत. बॅनर्जी यांच्या राजकीय काळात कित्येकजण तिथे मतदारही बनलेले आहेत. बंगालचे कार्ड घेऊन अनेक मंडळी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश व इतर राज्यांमध्ये देखील पसरलेली आहेत. दिल्ली व उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीमध्ये ही निर्वासित मंडळी राहतात. मुंबईच्या झोपडपट्टीतही बऱ्याच प्रमाणात बांगलादेशी राहतात. ममता बॅनर्जी या एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जे काही भयानक निवेदन केलेले आहे, त्याची केंद्राने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. खरेतर पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्था पार कोसळलेली आहे. त्याच धर्तीवर ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यास योग्य वातावरण आहे. बांगलादेशींच्या प्रेमात असलेल्या ममता बॅनर्जी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्याचा जणू काही विडाच उचलला असावा, अशा आविर्भावात त्यांनी जे भडक पद्धतीचे निवेदन केलेले आहे, ते पाहता बांगलादेशमध्ये अलीकडेच जी अराजकता निर्माण होऊन तेथील पंतप्रधानांना देश सोडून जाणे भाग पडलेले आहे, त्याच धर्तीवर पंतप्रधान मोदींवर ते निशाणा साधत आहेत. बंगाल पेटला तर आसामसह अनेक राज्यात आग पेटणार आणि पंतप्रधानांना त्यांचे पद गमवावे लागेल, असे म्हणण्याची हिंमत ममता बॅनर्जी यांना झालीच कशी? वास्तविक त्यांचे हे निवेदन म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. अशा भयानक विचारांच्या व्यक्तीला खरेतर सत्तेवर वा एखाद्या कोणत्याही महत्त्वाच्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहात नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले निवेदन हे या देशासाठी फार मोठे आव्हान आहे. तिच्या मनात नेमके कोणते विचार चालले आहेत, याचा अंदाज यामुळे होतो. एकतर ममता बॅनर्जी यांनी या देशाची माफी तरी मागावी अन्यथा स्वत: पदमुक्त होणे आवश्यक आहे. बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उद्भवली तशीच परिस्थिती या देशात उद्भवावी, असा हेतू तर त्यांच्या मनात नाही ना! उच्च पदावर असणाऱ्या मंडळींनी एवढा त्रागा करणे व वाट्टेल तशी बेधडक निवेदने करू नयेत. याचे साधे तारतम्य ममता बॅनर्जी यांना नसावे, हेच खरेतर दुर्दैव. गेली सात वर्षे त्या मुख्यमंत्रीपदावर आहेत. त्यांची एकंदरीत राजकीय कारकीर्दच वादग्रस्त ठरलेली आहे. त्यातच बुधवारी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि देशाला आव्हान देणारे जे भयानक निवेदन केलेले आहे, ते देशाच्या सार्वभौमत्वासाठी आव्हान ठरणारे आहे. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जर कारवाई आताच झाली नाही तर उद्या अन्य कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री अशा पद्धतीची निवेदने करीत राहतील आणि त्यातून देशासमोर नवी आव्हाने उभी राहतील. भारतात अराजकता माजावी यासाठी गेली काही वर्षे पाकिस्तान, भारतातील मुस्लिम मंडळींना चिथावून घालीत आहेत. त्यातच चीनने देखील अथक प्रयत्न केले. अलीकडच्या काळात अमेरिका देखील तशा पद्धतीचे प्रयत्न करीत असल्याचा संशय भारताला आलेला आहे. या पार्श्वभूमीवर साऱ्या देशवासियांना एकत्र व एकसंघ राहणे आवश्यक आहे. मात्र आपल्या देशात धार्मिक व जातियवादावरून आपसात तीव्र संघर्ष निर्माण होत आहेत व त्यातून स्फोटक वातावरण निर्माण होते. देशाला परकीयांकडून नव्हे तर अंतर्गत धोका वाटतोय, असे जे म्हटले जातेय, ते खोटे नाही. केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आमचे राजकीय नेते कोणत्याही पातळीवर जात आहेत. कैकवेळा देशाचा विसर राजकीय नेत्यांना पडतो. मध्यंतरी हैद्राबादहून विजयी झालेले मुस्लिम पक्षाचे नेते ओवेसी यांनी, आम्ही 25 कोटी जनता रस्त्यावर उतरलो तर 75 कोटी जनतेला कायमचे स्मरणात राहील, असा धडा शिकवू शकतो, अशी भयानक निवेदने केली होती. अशी निवेदने करणाऱ्यांना कायद्याची भीती वाटत नाही. राजकीय भीती तर मुळीच नाही कारण अशी भयानक पद्धतीची निवेदने करून देखील भारत सरकारने त्या व्यक्ती विरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. भारताच्या सार्वभौमत्वावर आणि भारतीय लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही. भारतीय तत्त्वे ज्यांना मान्य नाहीत, त्यांनी आवश्य देश सोडावा. ज्यांना पाकिस्तानात जायचे आहे, त्यांनी पाकिस्तानात जावे व ज्यांना बांगलादेश आवडत असेल तर त्यांनी आवश्य बांगलादेशात जावे. या देशाचे मीठ खाऊन या देशाविरोधात गरळ ओकणारी मंडळी कोणतीही संविधानिक पदे सांभाळू शकत नाही, हे आता ठणकावून सांगण्याची वेळ समीप आलेली आहे. ममता बॅनर्जी यांनी जी काही मुक्ताफळे उधळलेली आहेत, त्याबाबत त्यांना केंद्राने जाब विचारलाच पाहिजे. त्यांनी मांडलेले विचार हे भयानक स्वरुपाचे आहेत आणि देशालाच आव्हान देण्यासारखे निश्चित आहेत आणि उद्या त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन लाखो मंडळी जर देश पेटवायला निघाली तर अनर्थ निर्माण होईल. त्यामुळे त्यांनी केलेल्या बेताल निवेदनाला लगाम घालण्यासाठी कोणती ना कोणती तरी कारवाई होणे आवश्यक आहे. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री असला म्हणजे साऱ्या राष्ट्राची तुमच्यावर जबाबदारी नाही आहे आणि तुम्ही काय बंगालमध्ये राहून देशात अराजकता निर्माण करून देश ताब्यात घेऊ तर पाहात नाही ना! असेच एकंदर चित्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरून वाटते. ममता बॅनर्जी यांनी तूर्तास देशाची माफी मागावी. हे आता अति होतेय व ‘अति तिथे माती!’ हेही लक्षात असू द्या.