मंकी पॉक्स चाचणी कीट निर्मितीत भारताचे यश
मंकी पॉक्स या आजाराने जगभरात धुमाकूळ घातला असून आत्तापर्यंत या आजाराने 207 हून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यासंदर्भात अलीकडेच भारताला चाचणी कीट विकसित करण्यामध्ये यश आले असून त्याला मंजुरी मिळाली असल्याचे दिसून आले आहे. 2022 पासून उद्भवलेल्या मंकी पॉक्स या आजाराने जागतिक स्तरावरती ठराविक देशांची चिंता वाढवलेली असून जागतिक आरोग्य संघटनेने मंकी पॉक्सबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. व्हायरल मार्गाने होणाऱ्या या आजाराबाबत भारताने मंकी पॉक्स संदर्भातील चाचणी कीट तयार केले असून त्याला मंजुरी मिळाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलेल्या चिंतेच्या माध्यमातून भारताने मंकी पॉक्सबाबत संशोधनातून चाचणी कीट तयार केले आहे. या चाचणी कीटच्या माध्यमातून संबंधित रुग्णाला 40 मिनिटांमध्ये मंकी पॉक्स आजार झालाय किंवा नाही याबाबत समजू शकणार आहे. हे कीट आंध्र प्रदेशमधील मेडेक झोन या संशोधन मंडळाने राज्य सरकारच्या मदतीने व ट्रान्सासिया डायग्नॉस्टीक्ससोबत तयार केले आहे. 12 महिने हे कीट टिकू शकतं, असे म्हटले जाते. पारंपरिक पद्धती मार्फत मंकी पॉक्सची चाचणी करायला गेल्यास त्यासाठी एक ते दोन तास लागू शकतात व अशा प्रकारच्या पद्धती या ठराविक प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध असतात.
या अनुषंगाने पाहता भारताने मंकी पॉक्ससंबंधित आजार शोधणारे आरटी-पीसीआर एक कीट तयार करण्यात यश मिळवले आहे. आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरलॉजी, पुणे यांच्याकडून या चाचणीला मान्यता मिळाली आहे. मंकी पॉक्सअंतर्गत क्लेड 1 व क्लेड 2 प्रकाराचा अभ्यास या चाचणीमध्ये केला जातो. पीसीआर सेटअपची सोय असणाऱ्या प्रयोगशाळांमध्येसुद्धा या चाचणी कीटचा वापर करता येतो, असे सांगितले जाते. मंकी पॉक्स हा व्हायरल आजार आहे. एखाद्याला हा आजार झाल्याचे स्पष्ट झाल्यास त्याला त्याकरिता स्वत:ला स्थानबद्ध व्हावे लागते. या आजाराशी संबंधित रुग्णाला बरे होण्यासाठी जवळपास दोन ते चार आठवडे लागू शकतात. आजारात पेययुक्त आहार घेण्याचाच सल्ला वैद्यांकडून दिला जातो. मात्र काही दुर्धर आजार असणाऱ्यांना या आजाराची लागण होऊ शकते असेही तज्ञांनी म्हटले आहे.
कोविड 19 ची लागण हवेच्या माध्यमातून झाली होती. मंकी पॉक्सबाबतीत मात्र तसे दिसून येत नाही. आजार बळावलेल्या व्यक्तीशी संबंध आला तरच सदरचा आजार दुसऱ्याला बळावू शकतो. याशिवाय रुग्णाचे कपडे किंवा इतर साहित्य हाताळल्यानेही हा आजार दुसऱ्याला होऊ शकतो. त्यामुळे स्वच्छता ही फार महत्त्वाची ठरत असते. वैयक्तिक स्वच्छतेचा मंत्र जपावा लागतो. याचबरोबर रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तींनी जर का योग्यपणे सुरक्षेची साधने न वापरता रुग्णाची सुश्रुषा केली तर त्याच्यामार्फतही हा आजार इतरांपर्यंत पोहोचू शकतो. 2022 मध्ये उद्धवलेला हा आजार भारतात काही फारसा फैलावलेला नाही. 2022 ते 2024 या कालावधीमध्ये भारतात मंकीपॉक्सचे जवळपास 30 रुग्ण आढळून आले आहेत. 2022 मध्ये मध्य आफ्रिकेत बुरुंडी, कॅमरुन, कांगो, घाणा, आयव्हरी कोस्ट, लिबरीया, मोझांबिक, नायजेरीया, पाकिस्तान, फीलीपिन्स, रवांडा, स्वीडन, थायलंड आणि उगांडापर्यंत हा आजार पसरला.
या रुग्णांपैकी बहुतेक करून अन्य देशांमध्ये प्रवास करून आले आहेत त्याचप्रमाणे आफ्रिकन नागरिक जे भारतात राहतात त्यांच्यामार्फत हा आजार पसरवला गेला आहे. सरकारच्या स्तोत्रानुसार अलीकडच्या काळामध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांची नव्याने वाढ झालेली नसल्याची दिलासादायक बाब स्पष्ट करण्यात आली आहे. कोरोना काळात भारताने आपली स्वतंत्र लस विकसित करत संपूर्ण जगातच भारताचे नाव उंचावले होते. अनेक देशांनी भारतात निर्मित लस वापरुन आपल्या देशातील नागरिकांचे जीव वाचवलेले आहेत. त्यानंतरच लस किंवा चाचणी कीटच्या संशोधनात भारताने सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले आहेत. या संशोधनातूनच मंकी पॉक्सबाबतची चाचणी कीट विकसित करण्यात भारताला मिळालेलं यश हे नक्कीच स्पृहणीय म्हणता येईल. हे कीट मंकी पॉक्सच्या संशयीत रुग्णांकरीता अत्यंत सहाय्यकारी आणि जीवदान देणारे नक्कीच ठरेल यात शंका नाही. याचा वापर भारतासह इतर देशांनाही करता येण्याची संधी पुढील काळात असणार आहे.