For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यातील आरोग्य सेवेचा कायापालट करणार!

10:02 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यातील आरोग्य सेवेचा कायापालट करणार
Advertisement

आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव : तालुक्यातील एनजीओंतर्फे चालवणारी प्राथमिक आरोग्य केंद्रे पुन्हा वैद्यकीय खात्याकडे

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला उत्तम वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार तसेच वैद्यकीय सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक ते क्रम घेण्यात येतील, दुर्गंम भागात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवर आवश्यक असलेल्या ठिकाणी प्राथमिक उपचार केंद्रे सुरू करण्यात येतील. तसेच एनजीओमार्फत चालवणाऱ्या येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे पुन्हा वैद्यकीय खात्यात समाविष्ट करून त्या ठिकाणी उच्चशिक्षित डॉक्टरांची नेमणूक करण्यात येईल, तालुक्यातील वैद्यकीय सेवेचा येत्या दीड-दोन दिवसात निश्चित कायापालट करण्यात येईल, तसेच नव्याने बांधण्यात येत असलेल्या शंभर खाटांच्या दवाखान्याच्या निविदा प्रक्रियाबाबतही येत्या आठ-दहा दिवसात निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. यावेळी माजी आमदार अंजली निंबाळकर उपस्थित होत्या.

खानापूर येथे उभारण्यात आलेल्या माता-शिशू दवाखान्याचे उद्घाटन आणि नव्याने बांधण्यात येणाऱ्या शंभर खाटांच्या दवाखान्याच्या भुमीपूजनप्रसंगी आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव उपस्थित होते. माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या निवासस्थानी दिनेश गुंडूराव यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यातील वैद्यकीय सेवेबाबत त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तालुक्यातील वैद्यकीय सेवा सुधारण्याबाबत निश्चित क्रम घेण्यात येईल, असे सांगितले. तसेच तालुक्याची व्याप्ती पाहता आवश्यक असलेल्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच सध्या  प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ठिकाणांचे विस्तारीकरण करण्यासाठी तातडीने क्रम घेण्यात येईल, असे सांगितले.

Advertisement

यावेळी एनजीओतर्फे चालवण्यात येणाऱ्या लोंढा, कणकुंबी, अशोकनगर आणि कक्केरी येथील आरोग्य केंद्रांतील सेवेबाबत त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, याबाबत आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करून एनजीओमार्फत चालवण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे पुन्हा आरोग्य खात्याच्यामार्फत प्राथमिक केंद्रे चालविण्यात येतील, यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उच्चशिक्षित डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पारिश्वाड, इटगी, नंदगड येथील आरोग्य केंद्राचे विस्तारीकरण करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून याही ठिकाणी सर्वसामान्य जनतेला उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी क्रम घेण्यात येईल.

नव्याने उभारण्यात येणाऱ्या शंभर खाटांच्या दवाखान्याचे भूमिपूजन केले. मात्र अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसतानाच भूमिपूजन करण्यात आले असल्याचे त्यांना विचारले असता ते म्हणाले. येत्या आठ-दहा दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील, आणि कंत्राटदार निश्चित करून वर्कऑर्डर देण्यात येईल व त्यानंतर दवाखान्याची जुनी इमारत पाडवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. दीड-दोन वर्षात नवीन इमारत बांधून पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. यावेळी पत्रकारानी तालुक्यातील वैद्यकीय सेवेचा स्थर उंचावण्याबाबत तसेच एनजीओतर्फे चालविणारी प्राथमिक आरोग्य केंद्रे ही पुन्हा हस्तांतर करून घेण्यात यावी व त्या ठिकाणी आवश्यक असलेले कर्मचारी आणि डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी निवेदन स्वीकार करून आपण योग्य निर्णय घेऊ, असे  सांगितले.

उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न

राज्यातील प्रत्येकाला शासनाकडून उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आमचे प्रयत्न असून सर्वसामान्य जनतेला साध्या आजारापासून ते असाध्य आजारासाठी शासनाकडून आवश्यक ती वैद्यकीय सेवा देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहेत. यासाठी गाव पातळीवर वैद्यकीय सेवा पोहचविण्याचा काँग्रेस सरकारचा प्रयत्न सुरू आहे. बजेटमध्ये आम्ही वैद्यकीय सेवेला प्राधान्य दिले आहे.

Advertisement
Tags :

.